कोपरगाव : शेतातील ऊस पोलीस बंदोबस्तात तोडून नेल्याच्या रागातून तसेच शेतातील आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या तोडल्याच्या रागातून एकाच कुटुंबातील बाप-लेकांनी तसेच महिलांनी शिवीगाळ करीत एकमेकांना मारहाण करीत जखमी केले. ही घटना कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे सोमवारी (दि. ३) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
या हाणामारीत एकाच कुटुंबातील सोनाबाई दिनकर निकम, दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, दिनकर बच्चन निकम (सर्व रा. निकम वस्ती, सुरेगाव ता. कोपरगाव) हे चौघे जखमी झाले आहे. या प्रकरणी कुटुंबांतील सदस्यांनी मंगळवारी (दि. ४) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत.
यामध्ये दिलीप दिनकर निकम (वय ४८, रा. निकम वस्ती, सुरेगाव, ता. कोपरगाव) यांनी रमेश दिनकर निकम, विलास दिनकर निकम, अजय रमेश निकम, शैलेश रमेश निकम, दिनकर बच्चन निकम, सुनीता विलास निकम ( सर्व रा. निकम वस्ती, सुरेगाव ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली तर दिनकर बच्चन निकम (वय ७० रा. निकम वस्ती, सुरेगाव ता. कोपरगाव) यांनी दिलीप दिनकर निकम, मोतीराम दिनकर निकम, सोन्याबाई दिनकर निकम, भूषण दिलीप निकम, कविता मोतीराम निकम, वैशाली दिलीप निकम ( सर्व रा. निकम वस्ती, सुरेगाव, ता. कोपरगाव) यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.