श्रीगोंदा : तालुक्यातील विसापूर, मोहरवाडी, पारगाव येथील तलाव कुकडीच्या सुरू असलेल्या आवर्तनातून १० मार्चपर्यंत भरण्याचे आश्वासन कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी दिले. त्यामुळे कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड आणि शहाजी हिरवे यांनी शेतकऱ्यांसह सुरू केलेले उपोषण मंगळवारी मागे घेतले.
यावेळी खा. डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी मध्यस्थी केली. तलावात पाणी सोडण्यासाठी १ मार्च रोजी पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड आणि शहाजी हिरवे यांनी शेतकऱ्यांसह कुकडी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते.
यावेळी
खा. डॉ. सुजय विखे यांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर विखे, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी उपोषणस्थळी भेट देऊन कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी ८ मार्चपर्यंत सुरू असलेले कुकडीचे रोटेशन वाढवत १० मार्चपर्यंत सुरू ठेवून विसापूर, मोहरवाडी, पारगाव येथील तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेतले.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती गणपत काकडे, बाळासाहेब खेतमाळीस, बाबासाहेब बारगुजे, तात्याभाऊ भोसले, बापुराव नलगे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
....
तलाव कोरडेठाक
१ फेब्रुवारीपासून कुकडीचे आर्वतन सुरू झाले आहे. सुमारे एक महिना होत आला असून, तालुक्यातील विसापूर, मोहरवाडी व पारगांव येथील तलावामध्ये अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही. मोहरवाडी व पारगाव तलाव हे पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत. पिके सुकू लागल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.
...