नानासाहेब जठार। विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील शंभरीच्या उंबरठ्यावर असणारा विसापूर जलाशय येत्या दोन ते तीन दिवसात ओव्हरफ्लो होईल. जलाशयात ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे आकर्षित होतात. शनिवारी (दि.२) सकाळी विसापूर जलाशयात ९५ टक्के पाणीसाठा झाला होता. १९२७ साली या धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. त्यावेळी त्याची पाणी साठवण क्षमता १ हजार १३९ दशलक्ष घनफूट होती. ती आता ९२७ दशलक्ष घनफूट झाली आहे. त्यापैकी धरणामध्ये ८८० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. धरण भरण्यासाठी कुकडी कालव्याचे पाणी सोडण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही मागील आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे हंगा नदीला पूर आला असून धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. येत्या दोन ते तीन दिवसात धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. शंभर वर्षापूर्वी ब्रिटिशांनी धरण बांधले. बाराशे मीटर मातीचा बांध टाकून धरण तयार केले आहे. धरणाचा सांडवा चारशे मीटरचा आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्यात आकर्षक धबधबा तयार होतो. त्यामुळे येथे जिल्हाभरातून पर्यटक आकर्षित होतात. २०१८ मध्ये धरण ओव्हरफ्लो झाले होते. यंदाही धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नगर तालुक्यातील घोसपुरी पाणी योजनेच्या पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
विसापूर जलाशय काठोकाठ भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2019 1:39 PM