श्रीगोंदा : विसापूर तलावातून १५ एप्रिलपासून शेतीसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालवा सल्लागार समितीची बैठक सोमवारी कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक २ चे कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कुकडीच्या बैठकीस आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनःशाम शेलार, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार, गणपतराव काकडे तसेच २७ पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विसापूर तलावातून २५ दिवस आवर्तन सोडण्यात येणार आहे. हे आवर्तन शेतीसाठी देण्यात येणार आहे. आवर्तन सोडण्यापूर्वी पाणी वापर संस्थांकडील नऊ लाखांची थकीत पाणीपट्टी भरणे आवश्यक आहे. या आवर्तनाचा बेलवंडी, घारगाव, पिसोरे, चिंभळे, शिरसगाव बोडखा, लोणीव्यंकनाथ या गावांना फायदा होणार आहे.
९ एप्रिलला कुकडी कालवा सल्लागार समितीची पुण्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. या बैठकीत कुकडीचे पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.