नानासाहेब जठारविसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जेल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची जुनाट कौलारू इमारत मोडकळीस आलेली आहे. शाळा जिल्हा परिषदेची परंतु जागा व इमारत कारागृहाची ही शाळा ६७ वर्षांपासून कार्यरत आहे.शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत धरुन शिक्षण घेत आहेत. विसापूर कारागृह व भिक्षेकरी गृहाचे कर्मचा-यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा व्हावी यासाठी १९५१ साली या प्राथमिक शाळेची स्थापना करण्यात आली. त्यावेळी कारागृहाच्या मालकीच्या जागेत कारागृह प्रशासनाने या शाळेची इमारत बांधून दिली. त्याकाळी कौलारू इमारत बांधण्यात आली. ते कौल आत फुटतुट होऊन मोडकळीस आलेले आहेत. शाळेसाठी जिल्हा परिषदेची जागा नसल्याने नवीन बांधकामाचे प्रस्ताव तयार करण्यात अडचणी येत आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाकडून इमारत दुरुस्तीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन लोकसहभागातून इमारत दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सरपंच अरविंद जठार, कुकडी साखर कारखान्याचे संचालक धनंजय शिंदे, युवा कार्यकर्ते दानेश सय्यद, माजी सरपंच खंडेराव जठार, माजी सरपंच जब्बार सय्यद, सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, माजी उपसरपंच भाऊसाहेब शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शफीक शेख, बंडू जठार व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंगळे यांना दिले आहे.कारागृह प्रशासन शाळेबाबत सकारात्मकविसापूर खुल्या जिल्हा कारागृहाचे अधिक्षक दत्तात्रय गावडे यांनी या शाळेचे जागा व इमारतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या शाळेच्या खोल्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव तातडीने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. शाळेची जागा कायमस्वरुपी वर्ग करण्यासाठी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आल्यास तो प्रस्ताव मंजुरीसाठी कारागृह विभागाचे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक मिळाल्याने शाळेचे पालटणारविसापूर जेल प्राथमिक शाळेत नव्याने रुजु झालेले मुख्याध्यापक ज्ञानेश्वर इंगळे यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना विविध संस्थाकडून पुरस्कार मिळालेले आहेत. यापुर्वी ते सुपा(ता.पारनेर) येथील पवारवाडी शाळेत असताना त्यांनी तेथे लोकसहभागातून सुसज्ज इमारत बांधली. शाळेत वेगवेगळे शालेय उपक्रम राबवुन शाळा जिल्ह्यात मॉडेल बनवली. त्यामुळे त्या शाळेला जिल्हा परिषद, राज्य शासन व विविध सामाजिक संस्थांकडून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अनेक शिक्षण प्रेमींनी त्या शाळेला भेटी दिल्या. अशाच प्रकारची विसापूर जेलची शाळा ग्रामस्थ व कारागृहाचे सहकार्याने बनवण्यात येणार आसल्याचे इंगळे यांनी सांगितले. यासाठी सहशिक्षक बाळासाहेब नाव्हकर यांचे सहकार्य मिळत आहे.
विसापूर जेल शाळेची इमारत मोडकळीस : ग्रामस्थ करणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 10:29 AM