शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

समाजवादी विचारांचे द्रष्टे नायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 2:05 PM

संगमनेर शहर व तालुक्यातील अठरा पगड कारू-नारू, मुस्लिम, दलित, आदिवासी या सर्व वंचित समूहांना दुर्वे नाना आपला भक्कम आधार वाटत होता. दादासाहेब रुपवते यांनी मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून सिद्धार्थ बोर्डिंग तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले होते. दादासाहेब नगरला वकिली व राजकारण, समाजकारण करीत. त्यामुळे दुर्वे नानांनी बोर्डिंगमधील मुलांचे पालकत्व स्विकारले होते़  

अहमदनगर : कोणताही महापुरुष हा जसे इतिहासाचे अपत्य असतो, तसाच तो इतिहासाचा निर्माताही असतो़ तरीही महापुरुषांना इतिहासाची निर्मिती करताना असंख्य सर्वसामान्य माणसे आणि लोकांचे संघटन करणारे नेते यांचे सहाय्य घ्यावे लागते. महात्मा गांधींना असाच एक लोकनायक साथी भास्करराव दुर्वे नाना  यांच्या रूपाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर-अकोले परिसरात प्रवरातिरी लाभला़ पुढे संपूर्ण अहमदनगर जिल्हाच स्वातंत्र्य चळवळीचा बालेकिल्ला बनला. साथी भास्करराव दुर्वे नाना हे जसे या विभागातील स्वातंत्र्य आंदोलनातील नेते होते तसेच ते स्वातंत्र्यानंतर समतेच्या पायावर उभ्या असणाºया समाजवादी व्यवस्थेचे पुरस्कर्तेही होते़ शेतकरी आणि कामगारांना या दिशेने जागृत करणारे नेतेही होते़ सामाजिक, राजकीय व आर्थिक समतेसाठी आयुष्यभर नि:स्पृहपणे त्यांनी लढा दिला़ सामाजिक जीवनात नैतिक व पारदर्शी जीवन जगलेले असामान्य व्यक्तिमत्त्व आणि सर्व जाती धर्माच्या समूहांना सामाजिक अभियांत्रिकीच्या सहाय्याने संघटित करणारा महाराष्ट्रातील पहिला द्रष्टा समाजवादी नायक म्हणून साथी भास्करराव दुर्वे नानांचे आयुष्य आजही आदर्श व प्रेरणादायी आहे. १९४० च्या सुमारास  डॉ. ना. सु. हर्डीकर व एस. एम. जोशी संगमनेरला येऊन गेले व त्यांनी सेवा दलाच्या कामाची जबाबदारी नानांवर टाकली.  जिल्ह्यातील चळवळ अच्युतराव पटवर्धन चालवित होते. सरकारला सळो की पळो करून सोडण्यात आले. नाना आपल्या मित्रांसमवेत रानावनात भटकून चळवळ चालवित होते. सारी जनता भूमिगतांना साहाय्य करीत होती. चळवळ्यांना पकडण्यासाठी सरकार जनतेला जंग जंग पछाडीत होते. नानांना धरून देणारास सरकारने मोठे इनाम जाहीर केले. पण सरकारच्या पदरी निराशाच आली. पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकीत आपल्या सहकाºयांसोबत नगर, नाशिक, ठाणे जिल्ह्याच्या डोंगरदºयांतून साथीदारांसह ते भटकत राहिले. वेशांतर करून पोलिसांना चकविण्यात त्यांची ख्याती होती. कधी ‘स्त्री’च्या वेशात, तर कधी खांद्यावर कांबळी अन् डोईला मुंडासे बांधलेला शेतकरी बनून पोलिसांच्या हातावर ते तुरी देत. ते भूमिगत असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. भास्करराव दुर्वे अंत्ययात्रेत निश्चित हाती सापडणार, या कल्पनेत पोलीस खूष होते. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. पण पोलिसांना ते सापडले नाहीत. शेजारच्या घरावरून आपल्या घरात येऊन त्यांनी मातोश्रींची भेट घेतली़ सांत्वन केले. पोलीस हिरमुसले़ अशा कितीतरी हकिकती सांगता येतील. भूमिगत असताना त्यांना खरी मदत झाली ती सेवादल कार्यकर्त्यांची आणि दीनदुबळ्या खेडुतांची़ अकोल्याच्या डोंगरदºयांतील आदिवासींनी या काळात नानांना केलेले सहाय्य केवळ अतुलनीयच ठरावे़ चळवळीच्या कामासाठी या काळात ते मुंबईस गेले, तेथे ‘मूषक महाल’ या भूमिगत क्रांतिकारकांच्या गुप्त अड्ड्यात बैठक ठरलेली होती. पण मूषक महालाजवळ जाताच त्यांना अटक झाली. दीड वर्ष कारावासाची सजा सुनावण्यात आली. अहमदनगर जिल्ह्याच्या स्वातंत्र्य आंदोलनात रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन या समाजवादी विचारांच्या बंधुंचा राष्ट्रीय स्तरावर प्रभाव राहिला आहे. समाजवादी समाज रचनेचे ध्येय उराशी बाळगून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य चळवळ तेवत ठेवण्याची मोठी कामगिरी साथी भास्करराव दुर्वे यांनी बजावली़ स्वातंत्र्य लढ्यासाठी आवश्यक असलेले सामाजिक ऐक्य लक्षात घेऊन साथी भास्करराव दुर्वे यांनी आदिवासी, दलित, मुस्लिम व समाजातील सर्व वंचित जाती समूहांना एकत्र करून स्वातंत्र्य आंदोलनासाठी कार्यरत केले.  साताºयाच्या विराट सेवादल मेळाव्यालाही अनेक युवकांसमवेत दुर्वे नाना हजर राहिले. देशभक्तांच्या प्रयत्नांना यश आले. स्वातंत्र्य मिळाले. नानांना आता आपल्या कामाचे स्वरूप बदलवून घ्यावे लागले. शेतकरी हा समाज व्यवस्थेचा कणा आहे, हे लक्षात घेऊन आपल्या अगदी तरुण वयात २३ फेब्रुवारी १९४५ रोजी साने गुरुजी यांच्या उपस्थितीत अच्युतनगर, प्रवरा नदीतिरी संगमनेर येथे शेतकरी युवक परिषदेचे आयोजन केले होते़ भूमिहीन आदिवासींच्या हक्कासाठी उभारलेले लढे, सावकारशाही विरुद्ध पुकारलेले बंड, हे दुर्वे नानांच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील महत्वाचे टप्पे आहेत. अकोल्याच्या दुर्गम भागातील ‘खिरविरे’ या गावात सावकारी जाचाविरुध्द त्यांच्या नेतृत्वाखाली १९४७ साली शेतकरी लढा सुरू झाला. सावकारावर गावातील आदिवासी शेतकरी-शेतमजूर यांनी संपूर्ण बहिष्कार घातला. एका शेतकºयाने अन्यायाविरुद्ध आत्मार्पण करण्याची घोषणा केली. नानांच्या शब्दाखातर या शेतकºयाचे प्राण वाचविण्यासाठी रावसाहेब पटवर्धन घोड्यावर बसून गावात आले. लढा संपूर्ण यशस्वी झाला. १९४९ साली त्यांनी विडी मजदूर सभेची स्थापना केली. नानांच्या नेतृत्वाखाली या संघटनेने महाराष्ट्रातील विडी कामगार चळवळीत आदर्श ठरेल, असे मोलाचे कार्य केले. लोकांच्या व पक्षाच्या आग्रहामुळे ते निवडणुकीच्या राजकारणात पडले. पुरोगामीत्व व समभाव हा दुर्वे नानांच्या अगोदरपासून दुर्वे परिवाराचा स्थायीभाव होता़ दुर्वे नाना अनेक फाटक्या कुटुंबाचे आधार झाले. ते केवळ अनुयायी वाढावेत म्हणून नाही तर दुर्वे नानांनी अगदी जवळच्या माणसांकडेही शुद्ध चारित्र्य व नैतिकमूल्य अंगीकारण्याचा आग्रह धरला. नानांच्या शुद्ध आचरणाचा परिचय एका उदाहरणावरुन सर्वांनाच येतो़ नानांनी पक्षकामासाठी जागा खरेदी केली. स्वत:चे पैसे लावले हे तर खरेच, परंतु जागा विकणारा माणूस बेघर होणार नाही, याची काळजी घेतली़ या प्रकारच्या शुद्ध व्यवहाराचे प्रत्यंतर दुर्वे नानांच्या वैयक्तिक व सामाजिक आयुष्यात अनेक ठिकाणी आढळते. दुर्वे नानाचा पिंड हा सतशील राजकारण्याचा होता़ तरीही राजकीय व्यवहाराबाबत नाना अतिशय कठोर व वास्तववादी असल्याचे लक्षात येते. दुर्वे नानांनी १९५२, १९६२ व १९६७ अशा तीन वेळेस विधानसभेच्या निवडणुका लढल्या़ यश आले नाही़ पण निवडणूक संपताच शेतकरी, कामगार, आदिवासी यांच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. निवडणूक लढविताना सामाजिक कटुता, आकस, द्वेष पसरणार नाही, याचे भान त्यांनी सतत बाळगले. आपल्या राजकीय विरोधकांचा सन्मान करून उदार राजकीयवृत्तीचे त्यांनी दर्शन घडविले. समाजाचा सामाजिक, आर्थिक व राजकीय सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू प्रत्येक समाज घटकातला शेवटचा माणूस राहिला पाहिजे आणि त्याला सामाजिक सन्मान व पत प्राप्त झाली पाहिजे, हा दुर्वे नानांचा सतत ध्यास राहिलेला दिसतो.संगमनेर साखर कारखान्याच्या उभारणीच्या काळात इथला सामान्य कष्टकरी शेतकरीही कारखान्याचा मालक झाला पाहिजे, या कळकळीने दुर्वे नाना सायकलवर खेडोपाडी फिरले़ इथल्या सहकारामध्ये सामाजिक न्याय व समतेचा पाया दुर्वे नानांनी भक्कम केलेला दिसतो. संगमनेर महाविद्यालयाची उभारणी ही दुर्वे नानांच्या द्रष्ट्या संघटन कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. आपल्याबरोबर काम करणाºया, हातावर पोट असलेल्या, सामान्य विडी कामगारांची घामाची कमाई ज्ञानमंदिर उभे करण्याच्या कामी द्यायला तयार केले़ येथेच दुर्वे नानांनी सामान्य माणसांमध्ये असामान्य उच्चतम ध्येयाची ज्योत पेटवली़ त्याशिवाय त्यांच्या पुढच्या पिढीचे भविष्यही उजागर करण्यासाठी प्रोत्साहित केले. अथांग-उत्तुंग आणि प्रवरेच्या पाण्यासारखे निर्मळ व्यक्तिमत्त्व असलेल्या साधूशील प्रवृत्तीच्या दुर्वे नानांनी आयुष्यभर समाजाचा प्रपंच केला.कार्यकर्त्यांच्या पदोपदीच्या आग्रहानंतरही दुर्वे नानांनी त्यांची एकसष्टी करण्याची कल्पना फेटाळून लावली. एवढेच नाही तर स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुठलेच मानधन वा विशेष सवलती घेण्याचे त्यांनी नाकारले. दुर्वे नानांना मखरात मिरविणे जसे भावले नाही तसेच स्वत:च्या नावापुढे व्यक्ती महात्म्य दर्शविणारी बिरुदेही मानवली नाहीत. भास्कर गोविंद दुर्वे ही एकेरीतली गतिमान सही खूप काही सांगून जाते, दुर्वे नाना या व्यक्तिमत्त्वाबद्दल!वरवर शांत व आतून अंगार पेटलेला म्हणून कदाचित नाना मितभाषी असावेत आणि त्यामुळे अखंड कृतीप्रवणता व बिनचूक नेटकेपणा हे दुर्वे नानांच्या जगण्याचे व्रत होऊन गेले असावे. निग्रही, निष्काम, निरपेक्ष वृत्तीच्या अध्यात्माचे संचित खूप ठिकाणी विखुरल्याचे मी अनुभवले. दुर्वे नानांच्या स्मारकाच्या निमित्ताने अकोल्याच्या आदिवासी पाड्यांवर गावोगावी दुर्वे नानांच्या समकालीन साथींना भेटायला गेलो. अनेक घरातील मायमाउली दुर्वे नानांच्या आठवणीने व्याकूळ झाल्या. संगमनेर तालुक्याच्या पठारावरचा शाहीर नुसत्या आठवणीने बाहू फुरफुरून कडाडला-‘अजून धग कायम आहे. सगळेच काही विझले नाही.’ आपल्या कृतिशीलतेने, सात्त्विक व्यवहाराने मनस्वी चांगुलपणाने सामान्याच्या पातळीवर जगूनही काहीच भली माणसे जगण्यातल्या मूल्यांना समाजात प्रस्थापित करीत असतात़ तेव्हा ती कधीच विरून जात नाहीत. त्या मूल्यांबरोबर ती माणसेही चिरंतन होतात. समर्पित वृत्ती सर्व समाजवादी नेत्यांमध्ये संक्रमित झालेली होती. ही समर्पणवृत्ती संक्रमित झालेल्या नेत्यांमध्ये भास्करराव दुर्वे तथा दुर्वे नाना हे एक अव्वल दर्जाचे नेते होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी भूमिगत राहून केलेले काम, त्यांनी भोगलेला तुरुंगवास व त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्यांनी संगमनेर-अकोले या दोन्ही तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, विडी कामगार, आदिवासी यांच्या प्रश्नांवर केलेले लढे व सेवा यातून त्यांच्या या समर्पण वृत्तीचे दर्शन दोन्ही तालुक्यातील जनतेला झालेले आहे. संगमनेर-अकोले तालुक्यात ते एक नावाजलेले वकील म्हणून मान्यता पावलेले होते. परंतु त्यांची वकील फी गोरगरीब माणसाला परवडणारी असावी, म्हणून त्यांनी वकिलीच्या व्यवसायातून पैसा मिळविण्याचा हव्यास कधीच धरला नाही़ उलट अकोले तालुक्यातील अनेक आदिवासींना कोर्ट कामासाठी लागणाºया तिकिटांचा खर्चही स्वत: दुर्वे नाना करायचे. कधी कधी या गरीब आदिवासींना कोर्टातून घरी जाण्यासाठी एस. टी. भाडे देण्यासाठी पैसे आहेत की नाही याची ते चौकशी करायचे़ प्रसंगी एस. टी. भाड्यासाठीही ते लोकांना पैसे देत़ गरिबांबद्दलची ही कणव जेव्हा दुर्वे नाना दाखवायचे तेव्हा अगदी आदिवासी माणसेसुद्धा त्यांच्या या सहृदयतेचा गैरफायदा घेत नव्हते. कारण त्यांच्यातील पारदर्शक आपुलकीने गरीब माणसे पुलकित होत असत. याचा परिणाम म्हणून या सज्जन सत्पुरुषाला आपण जास्त त्रास देता कामा नये, ही भावना प्रचंड आदरापोटी गरीब माणसांमध्ये असल्याचे मी स्वत: अनुभवले आहे.दुर्वे नानांच्या अखेरच्या काळात ते आजारी झाले, तेव्हा संगमनेर-अकोले तालुक्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या उपचारासाठी काही निधी जमा करण्याची कल्पना मांडली. परंतु या कल्पनेला त्यांनी कडाडून विरोध केला. माझ्या आजाराचे सामान्य माणसापेक्षा अधिक स्तोम नको, अशी कडक समज त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना दिली. साधी राहणी, अपरिग्रह व निष्कांचन वृत्ती यात कोठेही ढोंगबाजीचा लवलेशही नसणारा हा पारदर्शी नेता आपल्या कर्तृत्वाचा ठसा संगमनेर-अकोला या दोन्ही तालुक्यांच्या इतिहासावर कायमचा उमटवून गेला. अशा विभूतीच्या सहवासात येण्याचे भाग्य माझ्यासारख्या साधारण कार्यकर्त्याला मिळाल्याबद्दल मला तर धन्य वाटतेच़ परंतु माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या व गोरगरिबांच्या जीवनातही धन्यता देऊन हा पुरुषोत्तम लोकोत्तर नायक झाला. १९५६ साल़ डिसेंबर महिना असावा. रात्री ११ वाजून गेलेले. दादासाहेब रुपवते घरी येणार म्हणून दुर्वे नाना वाट पहात बसलेले. दादासाहेबांनी १० ची वेळ दिलेली. कार्यकर्त्यांच्या गराड्यातून बाहेर पडून दादासाहेब ३/४ मुलांना घेऊन दुर्वे नानांचं घर गाठतात. दादासाहेब दुर्वे नानांना सांगतात, ‘बोर्डिंगमधील मुलांना कमी-जास्त लागलं तर लक्ष असू द्या़ तुमच्याशिवाय मला येथे कोण आहे.’बरोबर असणारी मुले १४-१५ वयाची होती. सर्व मुले दुर्वे नानांकडे एक टक पाहत होती. शिडशिडीत बांध्याची, डोळ्यावर चष्मा, चष्म्यातून डोकावणारी निरागस, परंतु तेजस्वी नजर, पांढरे स्वच्छ खादीचे कपडे परिधान केलेल्या व्यक्तीशी दादासाहेब अत्यंत जिव्हाळ्याने बोलत होते. अत्यंत निरखून मुले हे टिपीत होती.दादासाहेबांनी मागासवर्गीय समाजातील मुलांना शिक्षणाची संधी मिळावी, म्हणून सिद्धार्थ बोर्डिंग तालुक्याच्या ठिकाणी सुरू केले होते. दादासाहेब नगरला वकिली व राजकारण, समाजकारण करीत. बोर्डिंगमधील मुलांचे स्थानिक पालक म्हणून दुर्वे नाना व भाऊसाहेब धुमाळ यांचेकडे पालकत्व दिले होते. ज्या ज्या वेळी अडचण भासे, त्या त्या वेळी भाजीपाला व धान्यासाठी, पैशासाठी मुले नानांकडे जात़ नाना पैसे देत नसत, हवे असणारे धान्य, भाजीपाला पाठवून देत. सर्व विद्यार्थी खेड्यातून आलेले, जन्मजात विषम जातिव्यवस्थेचे चटके बसलेले. गावातील दुकानात प्रवेश नाही, घरात प्रवेश नाही. मंदिरात प्रवेश नाही, पाणवठ्यावर बंदी़ हे सर्व खेड्यात अंगवळणी पडलेली मुले. दुर्वे नानांच्या घरात जाताना अगोदर बाहेरच थबकत असत. हे दुर्वे नानांच्या लक्षात आले. त्यांनी सर्वांना फारच झापले़ नि:संकोच घरात या़ कोठेही फिरा़ अशी समज दिली़ त्यांच्या माजघरापर्यंत मुलांनी जावे म्हणून मुद्दामच काही वस्तू मुलांना आणावयास सांगत. त्यांच्याकडे गेलेल्या विद्यार्थ्यांची ते सर्वप्रकारची विचारपूस करत़ गाव, घरची परिस्थिती, अभ्यासातील प्रगती, काही अड-नड विचारत़ विद्यार्थ्यांना मदत करत़ त्यामुळे विद्यार्थी व नाना यांच्यामध्ये ममत्वाचे नाते निर्माण झाले होते. त्या वयात साने गुरुजी समजले नव्हते. परंतु कळायला लागल्यापासून दुर्वे नानाच आम्हा विद्यार्थ्यांना साने गुरुजींचे रूपात दिसत असत. १९६२ साल़ सार्वत्रिक निवडणुकीचे वर्ष. समाजवादी पक्ष व आरपीआयची युती. कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी दादासाहेब रुपवते व संगमनेर विधानसभेसाठी दुर्वे नाना उमेदवार होते. दोघांचाही संयुक्त प्रचार कार्यकर्ते करीत असत. आर्थिकदृष्ट्या दोन्हीही उमेदवार व त्यांचे पक्षही दुबळे होते. परंतु कार्यकर्ते व उमेदवार मनाने, विचाराने मोठे होते. पण दादासाहेबांसारखे विद्वान लोकसभेवर व दुर्वे नानांसारखे निष्ठावंत बुद्धिवादी स्वातंत्र्यसेनानी विधानसभेवर कधीच निवडून येऊ शकले नाहीत. परंतु पराभवाचा लहानसा ओरखडाही दुर्वे नानांचे मनावर कधी उमटला नाही.दुर्वे नानांना अन्यायाची विलक्षण चीड होती़ तशी चीड मनात आली की, ती प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर प्रकट करीत़ सामाजिक विषमता दूर व्हावी, पीडितांना, दलितांना न्याय मिळावा आणि आपल्या देशाचे दैन्य दूर होऊन सम्यक समाजवादी सत्ता प्रस्थापित व्हावी, यासाठी त्यांच्या पिढीने आपल्या आयुष्याची चूड कधी विझू दिली नाही. ते राजकारणात समाजवादी पक्षाचे असले तरी त्यांच्या प्रभावाचे क्षेत्र पक्षापुरते मर्यादित राहिले नव्हते. पक्षाबाहेरील लोकांवरही त्यांच्या विचारांचा व मनापासून केलेल्या कृतीचा प्रभाव पडला होता. समाजवादाचा चेहरा मानवी असावा, असे त्यांना वाटे. संगमनेर व अकोले तालुक्यातील, परिसरातील अनेक क्रियाशील तरुण कार्यकर्त्यांच्या बाजूने कायम उभे राहून दुर्वे नानांनी त्यांना शक्य होईल, ते सर्व साहाय्य दिले. कितीतरी विधायक काम करणाºया संस्थांचे ते मार्गदर्शक व प्रेरणास्थान होते. संगमनेर महाविद्यालय, संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना, विडी कामगार सभा उभारणीतील त्यांचे कार्य कोणीही विसरु शकत नाही़नानांचे प्रथम घडणारे दर्शन मोठे विलोभनीय असे. सात्विक तेजाने उजळून निघणारे नानांचे हसरे मुख ज्यांनी पाहिले आहे, त्यांनाच ही विलोभनीयता समजू शकेल. साने गुरुजी आम्ही पाहिले नाहीत़ पण त्यांच्याविषयी बरेच ऐकले, वाचले आहे. गुरुजींच्या काल्पनिक दर्शनाला सत्यता लाभली ती नानांच्या भेटीत. खादीचा साधा अन् स्वच्छ पोषाख त्यांच्या सात्त्विक व्यक्तिमत्त्वाला अनुरूप होता! नानांच्या अंगावर खादीला आपले ‘चीज’ झाले, असे वाटावे इतके ते अंतरबाह्य शुद्ध, निर्मळ अन् नितळ व्यक्तिमत्त्वाचे. पायजमा, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि गांधी टोपी याच वेशात आठवते तसे आम्ही नानांना पाहत होतो. गांधीजींच्या चळवळीत खादीचे जे निग्रही व्रत त्यांनी स्वीकारले ते आजन्म टिकवले.विनामोबदला लढविली कायदेशीर लढाईगांधीजींच्या साधन शूचितेचे ते खंदे पुरस्कर्ते, निवडणुकीतही या व्रताशी तडजोड त्यांनी स्वीकारली नाही. आदर्श प्रतिस्पर्धी कसा असावा याचा धडाच स्वत:च्या निवडणूक उमेदवार म्हणून केलेल्या आचरणाने त्यांनी घालून दिला. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, भाववाढ विरोधी चळवळ, भूमिमुक्ती आंदोलन अशा स्वातंत्र्योत्तर काळातील महत्त्वाच्या लढ्यात ते अग्रभागी राहिले. भूमिहीनांना जमिनी मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेली कायदेशीर आणि आंदोलनात्मक लढाई संगमनेर-अकोल्याचे भूमिहीन शेतकरी कधीही विसरणार नाहीत. येडगाव, आढळा या धरणांमुळे विस्थापित झालेल्या हजारो शेतकरी कुटुंबांची कायदेशीर लढाई विनामोबदल्यात नानांनी यशस्वीपणे लढविली. मृत्युच्या अखेरच्या घटकेपर्यंत घरादारांना मुकलेल्या धरणग्रस्तांची प्रकरणे जातीने हाताळीत होते.बाबा आमटे यांच्या रचनात्मक संघर्ष या कल्पनेचे ते क्रियाशील पुरस्कर्तेच नव्हते, तर मूर्तिमंत प्रतीक होते. विडी कामगार, सहकारी संस्था, सानेगुरुजी वाचनालय, पेमगिरी रस्त्याचे श्रमदान, मुखेल येथील श्रमदानातून तयार झालेली पाणीपुरवठा योजना, सानेगुरुजी सभागृहाची इमारत इत्यादी कितीतरी गोष्टी त्यांच्यातील विधायक कार्यकर्त्यांची पोच देतील. बाबा आमटे यांच्या कामाने भारावलेले नाना वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही भर उन्हाळ्यात तेथील श्रमसंस्कार छावण्यांमध्ये जाऊन श्रमदान करीत. १९७३ च्या मे महिन्यात बाबा आमटे यांच्या सोमनाथ श्रमसंस्कार छावणीत १५ दिवस नाना आले होते. १५ दिवस मातीच्या टोकºया उचलून नाना परत निघाले, तेव्हा बाबा अन् साधनाताई त्यांना निरोप द्यायला दूरवर आले. नाना बस स्टँडकडे एकटेच निघाले. बराच वेळ बाबा त्यांच्याकडे एकटक पाहत राहिले़स्वातंत्र्यानंतरच्या काळात नवभारताच्या निर्मितीसाठी विडी कामगारांसारख्या समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकातील अडाणी माणसाची एकजूट करून विडी मजदूर सभेची उभारणी हे दुर्वे नानांचे भविष्यवेधी असे कार्य आहे. रात्रशाळा चालवून या घटकाला शिक्षित करण्याचा अट्टाहास धरीत असताना याच दरिद्री समाजाच्या श्रमाच्या कमाईतून दातृत्वाची भावना त्यांच्यामध्ये पेरली आणि त्याच पैशावर संगमनेर महाविद्यालयासारखा शैक्षणिक परिसर उभा राहिला. दादासाहेब रुपवतेंना सोबत घेऊन लढलेली पहिली निवडणूक दुर्वे नानांच्या सामाजिक क्रांतीच्या द्रष्टेपणाचे दर्शन घडविते. सामाजिक परिवर्तनाचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा या मतदारसंघातील बी. सी कांबळे यांचा विजय हा दुर्वे नानांच्या कसदार नेतृत्वाचा विजय आहे. संगमनेर शहर व तालुक्यातील अठरा पगड कारू-नारू, मुस्लिम, दलित, आदिवासी या सर्व वंचित समूहांना दुर्वे नाना यांचे नेतृत्व हा आपला भक्कम आधार वाटत होता. म्हणूनच नूर मोहंमद शरफुद्दीन शेख यांची पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून झालेली निवड हा नानांच्या कृतिशिल जगण्याचा विजय होता. संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीत अल्पभूधारक शेतकरी कारखान्याचा मालक व्हावा, यासाठी नानांनी आग्रह धरला़ नानांनी निर्माण केलेल्या संस्था संघटनांची जीवनाच्या शेवटपर्यंत चिंता वाहिली. संगमनेर महाविद्यालयाचे भूमी आरक्षण प्रकरण असो वा तंत्र शिक्षण विद्यालय जीवनाला उपयोगी पडणाºया शिक्षणाचे केंद्र व्हावे, यासाठी नाना सतत प्रयत्नशील राहिले. २९ एप्रिल १९२० साली जन्मलेल्या स्वातंत्र्य सैनिक साथी भास्करराव दुर्वे नाना यांनी १३ डिसेंबर १९७९ साली सर्वांचा निरोप घेतला़ नानांना ५९ वर्षांचे आयुष्य लाभले. सन २०१९ च्या २९ एप्रिलपासून स्वातंत्र्यसैनिक साथी दुर्वे नाना यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरु असून एप्रिल २०२० पर्यत जन्मशताब्दी वर्ष आपण साजरे करणार आहोत. स्वातंत्र्यसैनिक साथी भास्करराव दुर्वे नानांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन होईल असे काही रचनेचे, संवादाचे, संघर्षाचे आणि निर्धाराचे व कृतिशील उपक्रम जन्मशताब्दीच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न आहे. 

लेखक : राजाभाऊ अवसक (सचिव, दुर्वे नाना प्रतिष्ठान)

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLokmatलोकमत