ब्रिटिश दप्तरी १८५२ पासून शिर्डीत पोलीस पाटलांच्या नियुक्त्या सुरू झाल्याच्या नोंदी आहेत. शिंदे यांना मुलकी तर गोंदकर, कोते, शेळके या घराण्यात प्रत्येकी दहा वर्षांची आलटून पालटून पाटीलकी देण्याचा रिवाज होता.
साईबाबांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या देहाचा पंचनामा करण्याचे भाग्य लाभलेल्या संताजी भिवसेन शेळके यांच्या घराण्यात २५ जानेवारी, १९५० रोजी विठ्ठलराव शेळके पाटील यांचा जन्म झाला. वारसा परंपरेतून १९८३ साली विठ्ठलरावांची पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली. अवघ्या तीन वर्षांत वयाच्या छत्तीसाव्या वर्षी विठ्ठलरावांचे निधन झाले. त्यांच्याबरोबरच शिर्डीतील पोलीस पाटीलकीची परंपराही संपुष्टात आली. त्यांच्या निधनाच्या वेळी संपूर्ण गावाने दिवसभर व्यवहार बंद ठेवून त्यांना आदरांजली अर्पण केली होती.
लहानपणापासून समाजकार्याची व सांस्कृतिक कार्याची आवड असणारे विठ्ठलराव धाडशी व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व म्हणून पंचक्रोशीत सुपरिचित होते.
शिर्डी विकास सोसायटीचे माजी संचालक संपतराव शेळके, पंडितराव शेळके, श्यामराव शेळके या बंधुसह मिलिंद शेळके, राहुल शेळके, प्रमोद शेळके, सुनील शेळके आदींनी विठ्ठलरावांच्या जयंतीचे आयोजन केले आहे.