अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठी दोन महिन्याचा कालावधी हातात आहे़ ज्यांना खरोखरच लोकसभेची उमेदवारी करायची आहे, ते दोन महिन्यात दक्षिण मतदारसंघातील सातशेहून अधिक गावात पोहोचू शकतील काय? असा सवाल करत पुढाऱ्यांचा आदेश आल्यानंतर त्यांनी दिलेल्या उमेदवाराचे कर्तृत्व, त्याची कर्तबगारी काय आहे, अशी विचारणा करा मगच मतदान करा, असे आवाहन डॉ़ सुजय विखे यांनी केले.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथे बुधवारी झालेल्या सभेत विखे बोलत होते़ यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, अजय रक्ताटे यांच्यासह निंबेनांदुर ढोरजळगाव, वाघोली, भातकुडगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते़ विखे म्हणाले, स्व़ बाळासाहेब विखे व स्व़ मारुतराव घुले यांनी पाहिलेले सहकाराचे स्वप्न जोपासण्याचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे़ मागील तीन वर्षात मी दक्षिणेतील ४०० हून अधिक गावांना भेटी दिल्या़ या मतदासंघात २९ आरोग्य शिबिराच्या माध्यमातून ५७ हजारहून अधिक रुग्णांची आरोग्य सेवा केली़आपण कधीही ताकाला जाऊन भांडं लपवत नाही़ लोकसभा निवडणूक लढवणारच आणि जिंकणार, अशी भूमिका सातत्याने गेली तीन वर्षे लोकांसमोर मांडत आहे, असे विखे म्हणाले़
मतदारांनो, लोकसभेच्या उमेदवाराला कर्तबगारी विचारा - सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:42 AM