अहमदनगर: नगर लोकसभा मतदारसंघात २३ तर शिर्डी मतदारसंघात २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी दोन्ही लोकसभा मतदारसंघातील दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, व्यापारी आस्थापना, औद्योगिक उपक्रम, माहिती तत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या नोकरदारांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुटी द्यावी, असे निवडणूक आयोगाने आदेश दिले आहेत़या आदेशानुसार अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या मतदानाच्या दिवशी एकही कामगार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सर्व कामगारांना भरपगारी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली असून अपवादात्मक परिस्थितीत ज्या औद्योगिक आस्थापना बंद ठेवल्याने त्यांचे नुकसान होत असेल अशा आस्थापनेतील कामगारांना मतदान करण्यासाठी किमान 2 ते 3 तासांसाठी सुटी देणे त्या संबंधित आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले आहे़ ज्या आस्थापना कामगारांना मतदानासाठी २ ते ३ तासांसाठी सुटी देत नसतील अशा आस्थापनांच्या कामगारांनी मतदानाच्या दिवशी तक्रारी तथा दाद मागण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त, स्टेशन रोड, अहमदनगर येथे संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर यांनी केले आहे़
नोकरदारांना मतदानासाठी पगारी सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:34 PM