अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया मंगळवारपासून दि. १९ सुरू होत असून, येत्या २० फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी ही निवडणूक हाेत आहे. गेल्या आठवड्यात अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम सहकारी संस्थांच्या निवडणूक प्राधिकरणाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला होता. त्यास प्राधिकरणाकडून शुक्रवारी मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती बँकेच्या वर्तुळातून देण्यात आली.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारच्या कर्जमाफी व त्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊमुळे बँकेची निवडणूक प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली होती. ही स्थगिती शासनाने उठविली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नेत्यांच्या गुप्त बैठकांना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत नुकतीच बैठक झाली. या बैठकीत पाच सदस्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. त्यात आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना आणखी वेग येणार आहे.
...
असा आहे निवडणूक कार्यक्रम
दि. १९- उमेदवारी अर्ज वाटप
दि. २७- उमेदवारी अर्जांची छाननी
दि.२८ वैध अर्जांची यादी जाहीर
दि.२८ जानेवारी ते ११ फेब्रुवारी- अर्ज माघारीसाठी मुदत
दि.- १२ फेब्रुवारी -उमेदवारांना नियमावलीचे वाटप
दि. २० फेब्रुवारी मतदान
दि.२१ फेब्रुवारी मतमोजणी