अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या मतदान यंत्रांची सरमिसळ गुरुवारी करण्यात येणार आहे़ नागापूर औद्योगिक वसाहतीतील शासकीय गोदामात सकाळी १० वाजता ही कार्यवाही होणार असल्याचे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे़विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे़ मतदानासाठी सन २००६ नंतरचे मतदान यंत्र वापरण्यात येणार आहेत़ उत्तर प्रदेशातून ही यंत्र आणण्यात आली आहेत़ उत्तर प्रदेशातून आणलेली ९ हजार ४०० मतदान यंत्र नागापूर येथील शासकीय गोदामात ठेवण्यात आली आहेत़ यंत्रांची तपासणी करण्यात आली असून, मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांची सरमिसळ करण्यात येणार आहे़ राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थित ही प्रक्रिया राबविली जाणार असून, सर्व राजकीय पक्षांना तसे कळविण्यात आले आहे़ त्यानंतर ही मतदान यंत्र मतदारसंघातील मतदान केंद्रांवर रवाना केली जाणार आहेत़जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात ३ हजार ५९३ मतदान केंद्रांवर मतदान घेतले जाणार आहे़ नगर शहर वगळता उर्वरित मतदारसंघात नेहमीचे मतदान यंत्र असणार आहेत़ नगर शहरात व्हीव्हीपीटी यंत्र वापरले जाणार आहे़ त्यामुळे आपण कुणाला मतदान केले, याची माहिती काही सेकंदात मतदारांना मिळणार आहे़ शहरातील २६५ मतदान केंद्रांवर ही यंत्र जोडली जाणार आहेत़ मतदान यंत्रांची सर्व माहिती राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दिली जाणार असून,त्यांच्या शंकांचे निरसन केले जाणार आहे़ राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी यावेळी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
मतदान यंत्रांची आज सरमिसळ
By admin | Published: September 17, 2014 11:24 PM