अहमदनगर : नगर शहरातील व्हीआरडीई स्थलांतराला अखेर ‘ब्रेक’ मिळाला. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी सोमवारी केंद्रीय संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांची दिल्लीत भेट घेतली. येथील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
व्हीआरडीईच्या स्थलांतराबाबत माहिती मिळाल्यानंतर खासदार विखे यांनी तातडीने दिल्ली गाठली. दिल्ली येथे व्हीआरडीईचे चेअरमन यांचे तांत्रिक सल्लागार संजीव कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. व्हीआरडीई स्थलांतरणाबाबत सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान नगरमधील व्हीआरडीई स्थलांतरित करण्याचा केंद्रीय संरक्षण खात्याचा विचार नाही. तसेच भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आत्मनिर्भर भारत योजनेतून संरक्षण विभागाच्या या संस्थेचे अधिक बळकटीकरण करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. अन्य प्रकल्पही देण्याबाबतचा विचार व्हीआरडीईच्या अधिकाऱ्यांनी बोलून दाखविला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याबाबत पत्रकार परिषद घेऊन स्वत: खुलासा करणार असल्याचे विखे यांनी सांगितले.