तीसगाव : मूळच्या प्रतिदिन आठशे मेट्रिक टनावरून अडीच हजार मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेत वृद्धेश्वर साखर कारखान्याचे विस्तारीकरण झाले. इथेनॉल प्रकल्पालाही केंद्र शासनाने मान्यता दिली. राज्यात सहकारी साखर कारखाने अवसायनात निघत असताना वृद्धेश्वर सुस्थितीत आहे. संस्थेच्या हितासाठी निवडणूक बिनविरोध करण्यात यावी, असा सार्वत्रिक सूर शनिवारी पाथर्डी येथे घेण्यात आलेल्या कारखान्याच्या निवडणूक विचारविनिमय सभेत निघाला.
बिनविरोधचे संचालक निवडीचे सर्व अधिकार ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांच्याकडेच राहतील, असा महत्त्वपूर्ण ठरावही यावेळी उपस्थित असलेल्या ऊस उत्पादक शेतकरी, सभासदांच्या वतीने हात उंचावून करण्यात आला.
अप्पासाहेब राजळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ. मोनिका राजळे, भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत म्हस्के, गहिणीनाथ थोरे, अर्जुनराव शिरसाठ, तीसगावचे सरपंच काशीनाथ लवांडे, सुरेश आव्हाड, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, रामकृष्ण महाराज कराळे व्यासपीठावर होते.
खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष बाळासाहेब अकोलकर, ज्येष्ठ संचालक उद्धवराव वाघ, माजी समाजकल्याण सभापती अर्जुन शिरसाठ आदींनी कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीचा आढावा भाषणातून सांगितला.
सरपंच काशीनाथ लवांडे यांनी विरोधासाठी विरोध ही भूमिका सहकारी संस्थांच्या राजकारणात योग्य नसल्याचे सांगत बिनविरोध भूमिकेला सार्वत्रिक समर्थन मिळावे, असे आवाहन केले.
अप्पासाहेब राजळे यांनी कारखाना प्रगतीचा आढावा सांगत सहकाराची व्याख्या विषद केली. स्वागत चारुदत्त वाघ यांनी केले. प्रास्ताविक हिंदकुमार औटी यांनी केले. माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी आभार मानले. विष्णुपंत अकोलकर, वैभव आंधळे, विष्णुदास भोरडे, पोपटराव कराळे, पुरुषोत्तम आठरे आदींसह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद हजर होते.