करंजी : पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर देवस्थान कमिटीची निवड धर्मादाय आयुक्तांमार्फत केली जाईल, असा महत्त्वपूर्ण निकाल पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिला. त्यांनी नगर येथील धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निकाल कायम ठेवल्याने वृद्धेश्वर देवस्थान विश्वस्त मंडळ निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.गर्भगिरी डोंगराच्या कुशीत व निसर्गाच्या सानिध्यात असलेले, नाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र वृद्धेश्वर देवस्थानच्या दर्शनासाठी राज्यभरातून हजारो भाविक दरवर्षी दर्शनासाठी येतात. देवस्थानमध्ये फारशा सुधारणा होत नसल्याने भाविकांना सुविधा मिळत नव्हत्या. त्यामुळे वृद्धेश्वर देवस्थान कमिटी व ग्रामस्थांमध्ये वाद होता. येथील देवस्थानच्या कारभाराबाबत ‘लोकमत’ने ‘संघर्ष वृद्धेश्वरचा’ ही वृत्तमालिका प्रकाशित करून यावर वेळोवेळी प्रकाश टाकला होता. या देवस्थान कमिटीच्या कारभाराविरुद्ध ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होता. परंतु, देवस्थानच्या घटनेत ही कमिटी आजीवन राहिल असे नमूद केलेले होते.या घटनेत बदल करावा, दर पाच वर्षांनी विश्वस्तांची नेमणूक व्हावी अशी तक्रार ग्रामस्थांच्यावतीने हिम्मत पंढरीनाथ पडोळे व एकनाथ रावसाहेब पाठक यांनी नगरच्या धर्मादाय आयुक्तांकडे केली होती. ३ वर्षांनंतर नगरच्या धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानच्या घटनेत बदल करून वृद्धेश्वर देवस्थानच्या कमिटीची निवड दर ५ वर्षांनी धर्मादायआयुक्त करतील असा निकाल दिला होता.नगरच्या धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालाविरूद्ध देवस्थान कमिटीने पुणे येथील धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितली होती. पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून डी. एम. देशमुख (चॅरिटी कमिशनर पुणे) यांनी मंदिर, देवस्थान कोणाची खासगी मालमत्ता होऊ शकत नसल्याचे सांगून नगरच्या धर्मादाय आयुक्तांनी दिलेला निकाल कायम ठेवला. त्यामुळे वृद्धेश्वर देवस्थान कमिटी निवडीचा मार्ग मोकळा झाला.पुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालामुळे भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडली. त्यामुळे देवाची सुटका झाल्याची भावना भाविकांमध्ये आहे. -हिम्मत पडोळे, तक्रारदारपुणे येथील धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या निकालामुळे देवस्थान कमिटीने आजीवन राहण्याचा हट्ट सोडून देवस्थान विकासाला मदत करावी. - नवनाथ पाठक, उपसरपंच, घाटसिरस
वृध्देश्वर देवस्थान : विश्वस्त निवड अधिकार धर्मादाय आयुक्तांनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 11:43 AM