कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेच्या पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाईच्या कामासंदर्भात नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे वारंवार चुकीची वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोहोचवत असल्याचा खुलासा गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट के. एस. रेड्डी यांनी केला आहे. मंगळवारी रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन पाच नंबर साठवण तलावाच्या कामासंदर्भात घटनाक्रम सांगितला. रेड्डी म्हणाले, गायत्री कन्स्ट्रक्शनचे काम रस्ते बनविण्याचे आहे. या कंपनीमार्फत मुंबई - नागपूर समृध्दी महामार्गाचे काम चालू आहे. या रस्त्याच्या भरावासाठी तीन किलोमीटर अंतरातून माती व मुरूम घेतला जातो. तेथील शेतक-यांना विनामूल्य शेततळे तयार करून दिले जाते. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी आम्हांला १५ जानेवारी २०१९ रोजी समृध्दी महामार्ग भरावासाठी मोठ्या प्रमाणात माती व मुरूम लागणार आहे. त्यासाठी कोपरगाव नगरपालिकेने प्रस्तावित केलेल्या साठवण तलाव क्रमांक ५ मध्ये खोदकाम करून माती व मुरूम उचलावा याबाबतचे पत्र दिले. कोपरगावच्या पिण्याच्या पाण्याची दाहकता लक्षात घेऊन आम्ही या कामास संमती दिली. यावर आम्ही नगरपालिकेला पत्र देऊन तलाव ते समृध्दी महामार्ग हे अंतर १५ किलोमीटर आहे. त्यासाठी आम्हाला ५ कोटी रूपयांचा वाहतूक खर्च लागणार आहे, असे कळविले. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याशी या कामाबाबात सविस्तर चर्चा करून माती उचलण्यासाठी लागणारा पैसा आम्ही एकटे खर्च करू शकत नाही. पालिकेने अधिकचा खर्च द्यावा व यासंदर्भात शासकीय टेंडर काढून माती उचलण्याची परवानगी द्यावी. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता पालिकेने करून द्यावी, असे सांगितले. मात्र पालिकेने अद्याप कुठलीही कागदपत्रे आम्हाला दिलेली नाहीत.या कामासंदर्भात जिल्हाधिकारी व आपली बैठक आटोपल्यानंतर आशुतोष काळे यांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर भेट झाली त्यावेळीही त्यांना आपण स्पष्ट कल्पना दिली की,तीन किलोमीटर अंतरातील वाहतुकीची परवानगी आहे. मात्र पालिकेचा साठवण तलाव पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. या तलावाची माती नेण्यास आपण तयार आहोत. मात्र वाहतुकीला लागणारा खर्च नगरपालिकेने करावा. नगराध्यक्ष विजय वहाडणे हे देखील आपल्याला दोन वेळा भेटले आहेत. त्यांनाही आम्ही वरीलप्रमाणेच सांगितले. मार्चपर्यंत रस्त्याच्या कामाला मातीची गरज आहे. तोपर्यंत नगरपालिकेने टेंडर काढावे असेही पालिकेला कळविण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले.
कोपरगावच्या पाणी प्रश्नाबाबत वहाडणे यांनी गैरसमज पसरविले - के. एस. रेड्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 12:51 PM