अहमदनगर : जिल्ह्यातील हॉटेल, बार, रेस्टॉरंटस् सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी एका आदेशान्वये परवानगी दिली आहे. या आदेशामुळे ग्राहक आणि हॉटेल चालकांच्या आनंदात भर पडली आहे.
मार्चमध्ये लॉकडाऊन सुरू झाल्यापासून हॉटेल बंद आहेत. अनलॉक झाल्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंटस् यांना फक्त हॉटेल उघडे ठेवून पार्सल देण्याची परवानगी होती. तसेच इतर आस्थापनांप्रमाणेच आधी सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत हॉटेल उघडी ठेवण्यास परवानगी दिलेली होती. त्यानंतर गत महिन्यापासून आस्थापना उघडी ठेवण्यास सायंकाळी सातपर्यंत वेळ वाढविण्यात आली होती. त्यामुळे या वेळेचा ग्राहक असो की मालक यांना कोणताही फायदा झाला नव्हता.
एक आॅक्टोबरला दिलेल्या आदेशाप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंटस् उघडी ठेवण्याबाबतच्या वेळेबाबत स्पष्ट आदेश नव्हते. मात्र इतर आस्थापनांचाच वेळेच्या मर्यादेचा नियम हॉटेल, बारला लागू राहिल, असे आदेशात नमूद होते.
हॉटेल उघडी ठेवली तरी वेळेची मर्यादा सातपर्यंत असल्याने त्याचा काहीही फायदा होणार नाही, अशी हॉटेलचालकांची भूमिका होती. याचाही विचार करून रात्री दहापर्यंत वेळ वाढवण्यात आली आहे. हॉटेलबाबतचे सर्व नियम पर्यटन विभाग जारी करेल, असे आदेशात म्हटले आहे. हॉटेलचालकांना कोरोना उपाययोजनांबाबतचे सर्व नियम पालन करणे अनिवार्य असल्याचे आदेशात म्हटले आहे.
च्‘कोरोनाच्या भितीने हॉटेल, रेस्टॉरंटस्, बारमध्ये मोजकीच गर्दी’, असे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाले. तसेच हॉटेलच्या वेळेबाबत संभ्रम असल्याने हॉटेलचालक, ग्राहक चिंतित होते. या चर्चेचाही संदर्भ वृत्तात होता. हॉटेल सुरू ठेवण्यास सातपर्यंत मर्यादा असेल तर हॉटेलचालकांनाही ग्राहक येतील की नाही, याची चिंता होती. याकडे वृत्तातून ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. अखेर रात्री दहापर्यंत परवानगी मिळाल्याने हॉटेलचालक व ग्राहकांचाही जीव भांड्यात पडला आहे.