वडगाव पान : संगमनेर तालुक्यातील माळेगांव हवेली येथील लोकांना गेल्या ७० वर्षांपासून एसटी महामंडळाच्या लालपरीची प्रतीक्षा लागली आहे. एस. टी. बस नसल्याने विद्यार्थी, पालकांची मोठी गैरसोय होत आहे.कोल्हार-घोटी राज्य महामार्गालगत वडगाव पान येथून दोन किलोमीटर अंतरावर माळेगांव हवेली हे एक छोटेसे खेडेगाव आहे. या गावची लोकसंख्या दोन हजारच्या आसपास आहे. प्रत्येक घरामध्ये एक शिक्षक व एक गवंडी अशी या गावची ओळख आहे. या गावातील वाडीवस्तीवरील मुलांना दररोज महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडगाव पान येथील बस थांब्यावरून ये-जा करावी लागते. विद्यार्थी वडगाव पान येथील बस थांब्यावर वेळेत पोहोचले नाही तर त्यांना सुरुवातीच्या अनेक तासांना मुकावे लागते.कोपरगावला जाणारी बस वडगाव पान-माळेगांव हवेली येथून गेल्यास शालेय विद्यार्थी व लोकांची समस्या सुटेल. किंवा माळेगांव हवेली येथे सकाळी व सायंकाळी नविन बस सेवा मार्ग सुरु व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.गेल्या अनेक वर्षापासून माळेगाव हवेली ग्रामस्थांची एसटी बस सुरू करण्याची मागणी आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करुनही यश आले नाही. तरी येथे तातडीने एस. टी. बस सुरू करावी.-बाळासाहेब बोºहाडे, ग्रामस्थ.
७० वर्षापासून एसटीची प्रतीक्षा : माळेगाव हवेली ग्रामस्थांची व्यथा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 7:05 PM