उमेश कुलकर्णी । पाथर्डी : आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळालेल्या उप जिल्हा रुग्णालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. तालुक्याच्या विविध गावातून उपचारासाठी आलेल्या शंभराहून अधिक रूग्णांना तीन तास वाट पाहूनही वैद्यकीय अधिकारीच न आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावे लागले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उप जिल्हारूग्णालयात घडला. काही रुग्णांनी तेथील कर्मचाºयांवरच संताप व्यक्त केला.उपजिल्हा रूग्णालयात सकाळी ९ वाजता बाह्यरूग्ण विभाग सुरू होतो. त्यामुळे तालुक्याच्या विविध गावातून रूग्ण सकाळीच उपजिल्हा रूग्णालयात आले. यामध्ये ५३ वयाच्या रखमाबाई सोनाळे माणिकदौंडी, अडीच वर्षाचा सार्थक राठोड, हंडाळवाडी येथील बाळू हंडाळ, पाडळी येथील ६१ वयाचे अंकुश बेळगे, विशाल सावंत आदींसह १०० रूग्ण तपासणीसाठी रूग्णालयात आले होते. सर्वांनी दहा रूपये भरून केस पेपर काढले. आता डॉक्टर येतील या आशेवर हे रूग्ण बसून होते. काही रूग्ण आजारी असल्यामुळे रूग्णालयाच्या आवारात झोपलेले दिसून आले. काही रूग्ण तर देवासारखी डॉक्टरांची वाट पहात होते. परंतु, तीन तास उलटून गेले तरी बाह्य रूग्ण तपासणारे डॉक्टर येत नसल्याचे लक्षात आल्यावर रूग्ण व रूग्णांचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी उपस्थित कर्मचाºयांवर प्रश्नांचा भडीमार केला.यामुळे कर्मचारीही गोंधळून गेले. परिसेविका वाय. आर. वाघ यांनी डॉक्टरांशी संपर्काचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आशिष कोकरे यांच्याशी संपर्क केला. त्यांनी शहरामध्ये रहात असलेल्या इतर डॉक्टरांशी संपर्क करा, असे आदेश दिले. त्यानुसार कार्यालयातील कर्मचारी शासकीय गाडी घेवून डॉक्टरांच्या घरी गेले. परंतु, ते घरी नसल्याचे कळाले. या सर्व प्रकारानंतर तपासणीसाठी आलेल्या वृद्धांचे डोळे पाणावले. भल्या सकाळी उठून मिळेल त्या वाहनाने दवाखान्यात आलो होतो. परंतु, डॉक्टर नसल्यामुळे काहीही उपयोग झाला नाही. आजची आमची खर्ची गेली आणि दिवसही गेला, असे रखमाबाई सोनाळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्या रूग्णालयाच्या व्हरांड्यात झोपल्या होत्या. सविता मरकड यांनी मला खोकल्याचे औषध मिळाले नसल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीला सांगितले. एकेकाळी या रूग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार मिळाला होता. रूग्णालयामध्ये सर्व यंत्रसामुग्री असूनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही. गंभीर आजाराबाबत अहमदनगरला जावे लागेल, असा सल्ला नेहमीच दिला जातो, अशा तक्रारी काहींनी केल्या.प्रसूती विभाग नावालाच.. तीन पदे रिक्त गेल्या काही महिन्यापासून प्रसूती विभागही नावालाच आहे. आॅपरेशन थिएटर म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे. रूग्णालयात डॉक्टरांची सात पदे मंजूर असूनही तीन पदे रिक्त आहेत. सध्या डॉ. एन. ई. आव्हाड यांच्याकडे रूग्णालयाचा वैद्यकीय अधीक्षकाचा अतिरिक्त कार्यभार आहे. परंतु, ते दोन दिवस रजेवर असल्याचे कळाले. डॉक्टरच नसल्यामुळे बाह्य रूग्ण विभाग शुक्रवारी सुरूच झाला नाही. अत्यावश्यक घटना घडली तर काय करायचे याचे उत्तर मात्र मिळाले नाहीत.
तीन तास वाट पाहिली, वैद्यकीय अधिकारी फिरकलेच नाहीत; पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2019 2:21 PM