अहमदनगर : सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व बंद असलेली शाळा यामुळे मुक्त वातावरणात ज्ञानाचे पंख घेऊन गगनभरारी मारण्याचे स्वप्न हे स्वप्न न राहाता तंत्रज्ञानाच्या मदतीने वाकडी शाळेतील विद्यार्थ्यांनी चक्क चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ‘मिठाचा शोध’ या पाठाच्या लेखिका अंजली अत्रे यांना विविध प्रश्न विचारून त्यांचा लेखन प्रवास ऑनलाइन जाणून घेतला.
प्रारंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ शिक्षक मच्छिंद्र वडणे यांनी केले. उपक्रमशील शिक्षक राजू बनसोडे यांनी अत्रे यांचा परिचय करून दिला. सोबतच कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व तांत्रिक बाजू सांभाळली. वाकडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कविताताई लहारे यांनी पाहुण्यांचा सत्कार केला.
पंचायत समिती सदस्य अर्चनाताई आहेर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय कोते यांनीही मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. लेखिका अंजली अत्रे यांनी केलेले बागकाम, कुंडीतील लागवड, ग्लास पेंटिंग, चित्रकला आदी कला विद्यार्थ्यांनी जाणून घेतल्या.
अत्रे यांनी आपल्या नावीन्यपूर्ण कलेच्या आधारे नटवलेला घर व परिसर विद्यार्थ्यांना घरीच राहून ऑनलाइन पाहता आला.
राजमाता जिजाऊंनी शिवरायांसाठी अवलंबिलेल्या ‘कथेतून संस्कार’ या सूत्राचा वापर करत त्या लेखिका बनल्या. लेखनाबरोबरच विविध नाटके, मालिका, चित्रपट यांमधील त्यांचा सहभाग असल्याचे जाणून विद्यार्थी व पालक अवाक् झाले.
दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाकडी केंद्राचे केंद्रप्रमुख निवृत्ती शेलार, मुख्याध्यापक नाडेकर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
शाळेतील शिक्षक सतीश मुन्तोडे यांनी आभार मानले.
डावखर, गाडेकर, म्हंकाळे, किरण एलम, नितीन म्हसे, सुरेखा क्षीरसागर आदी शिक्षकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे व खासदार सुजय विखे यांच्या प्रेरणेतून शाळेत
विविध शालेय उपक्रम राबविले जातात, असे शिक्षकांनी सांगितले.