काँग्रेसला आघाडीसाठी वंचितची प्रतीक्षा, मनसेबाबत द्विधा मनस्थिती : बाळासाहेब थोरात साईदरबारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:06 PM2019-07-21T12:06:00+5:302019-07-21T12:24:55+5:30
लोकसभा निवडणुकीत पारंपारिक मतांना धक्का बसल्यामुळे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास इच्छुक आहोत.
शिर्डी: काँग्रेस आघाडीला वंचितमुळे लोकसभेत ९ जागांना फटका बसला. आगामी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष व पुरोगामी शक्तींनी एकत्र आले पाहीजे. राज ठाकरेंच्या सभा यशस्वी झाल्या. सभांच्या चर्चाही झाल्या. मात्र ही गर्दी मतात परावर्तित का होवू शकली नाही. आघाडीसाठी मनसेकडून अद्याप प्रस्ताव आलेला नाही. याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना मत व्यक्त केले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आज रविवारी थोरात यांनी साईदरबारी हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
थोरात म्हणाले, सध्या सत्तेवर जे आलेत ते राज्य घटनेमुळेच आलेत, मात्र अलीकडच्या काळात लोकशाही, राज्यघटनेतील मुलभुत तत्वांना सुरूंग लावला जात असल्याने आपण काळजीत आहोत. या पार्श्वभुमीवर लोकशाही चांगली, सदृढ राहावी यासाठी बाबांना साकडे घातल्याचे थोरात यांनी सांगितले. सर्वांना सोबत घेण्याच साईबाबांच जे तत्वज्ञान आहे तोच काँग्रेस विचार आहे. काँग्रेसचे विचार, तत्वज्ञान सर्वसामान्यांच्या अंतकरणात आहे. त्याला साद घालण्याचे काम कराव लागेल असे सांगत थोरात यांनी नक्की यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थानचे सीईओ दिपक मुगळीकर, काँग्रेसचे डॉ़ एकनाथ गोंदकर, राष्ट्रवादीचे निलेश कोते आदीची उपस्थिती होते.
तो केवळ योगायोग
राजकारणातील पारंपारिक विरोधक प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व खासदार डॉ़ सुजय विखे यांनी विमानात सोबत प्रवास केल्याचे फोटो माध्यमात झळकले. त्यांची या भेटीत आपसात काय चर्चा झाली याबाबत दोघांच्याही समर्थकात उत्सुकता होती. त्याबाबत त्यांना छेडले असता तो केवळ योगायोग होता, व्यक्तीद्वेशाला कधीही स्थान देत नसल्याने आपण खासदार विखेंच विजयाबद्दल अभिनंदन केले तसेच वडीलकीच्या नात्याने चांगले काम करण्याचा सल्लाही दिल्याचे थोरातांनी सांगितले.