आॅनलाइन लोकमतअहमदनगर, दि़ ४ - चहूबाजूंनी कुत्र्यांनी हल्ला चढविलेला आणि पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीचा आटापिटा चाललेला़़ कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित ती तान्हुल्या पाडसाला वाचविते़ मात्र, काही वेळानंतर पुन्हा कुत्र्यांचा हल्ला होतो़ तीची पुन्हा पाडसाला वाचविण्यासाठी कुत्र्यांसोबत लढाई सुरु होते़़ हे दृष्य वन्यप्रेमींच्या दृष्टीस पडल्यांनतर अखेर जीवघेण्या लढाईतून या मायलेकींना जीवदान मिळाले़ ही घटना कामरगाव येथे घडली़नगर-पुणे महामार्गावरील चास घाटानजिक नायकी शिवारात बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या झाडीत आडोशाला हरिणीची प्रसुती होत होती. गोंडस पाडसाला तिने जन्म दिला. त्याचवेळी या पाडसाची शिकार करण्यासाठी चार ते पाच कुत्रे टपून बसले होते़ हरिणीची नजर चुकवून हे कुत्रे त्या पाडसावर हल्ला चढवित़ मात्र, हरिण प्रत्येकवेळी कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित पाडसाचा जीव वाचवित होती़ कुत्रे हरिणीकडे धावून जात अन् पुन्हा पळत मागे येत असल्याचे दूरुनच बाळासाहेब देशमुख यांनी पाहिले़ त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता हरिणीच्या पाडसावर कुत्रे हल्ला करीत असल्याचे देशमुख यांना दिसले़ त्यांनी कुत्र्यांना हुसकावले़ पण कुत्रे तेथून दूर जाईनात़ हरिण व पाडसाला वाचविण्यासाठी देशमुख यांनी फोनवरुन हा घटनाक्रम वन्यप्राणी सेवा समितीचे तुकाराम कातोरे, विक्रम साठे, श्याम जाधव यांना सांगितला. त्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन कुत्र्यांना पिटाळून लावले व जखमी पाडसावर प्रथमोपचार केले़ नंतर त्याला दूध पाजले. हरीण मात्र दूरवरुन टेहळणी करीत होती. नंतर सर्वांनी पाडसाला हरिणीच्या जवळ नेऊन सोडले़ पाडसाला घेऊन हरणीने जंगलाकडे धाव घेतली.वनविभागाचे दुर्लक्षकामरगाव-चास-वाळवणे हद्दीत वनविभागाची ५० ते ६० हेक्टर जमीन आहे. हरीण, ससे, तरस, लांडगे यांच्यासह अनेक वन्यजीव या परिसरात आसरा घेतात़ मात्र, पाण्यासाठी मानवी वस्तीकडे आलेल्या प्राण्यांना अनेकदा जीव गमवावा लागतो. वनविभागाला जंगलात पाणवठे करणे शक्य असताना वनविभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे वन्यजीव सेवा समितीने ‘लोकमत’ला सांगितले़
तान्हुल्या पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीची जीवघेणी लढाई
By admin | Published: May 04, 2017 1:36 PM