कोपरगाव : शहरात कोरोना विषाणूची दुसरी लाट आलेली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रभागनिहाय कोरोना सुरक्षा समिती स्थापन करावयाची आहे.
प्रत्येक प्रभागातील दोन नगरसेवक व त्याच प्रभागातील चार नागरिक अशी सहा लोकांची समिती असणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांना स्वतःहून या समितीत काम करायचे आहे. त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली नावे नगरसेवकांच्या माध्यमातून १२ एप्रिलला दुपारी २ वाजेपर्यंत उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्याकडे द्यावीत, असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.
वहाडणे म्हणाले, या समितीमार्फत आपापल्या प्रभागातील कोरोनाबाधित रुग्णांची नावे, त्यांना उपचारासाठी भरती केलेल्या खासगी दवाखाना, कोविड सेंटरची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती, कोरोनासंबंधित लक्षणे आढळून येणाऱ्या व्यक्तींची नावे आदी माहिती कार्यालयात कळविणे, ही जबाबदारी पार पाडायची आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावयाची आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा, अधिकारी-कर्मचारी यांना सहकार्य करणे हे जागरूक नागरिक म्हणून आपले कर्तव्यच आहे. सर्व सन्माननीय नगरसेवकांना अशा समित्या स्थापन करण्याचे लेखी कळविले आहे.