कोपरगाव : बुधवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसाने कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव या दोन गावांचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित आहे. महावितरण प्रशासनाकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. कोपरगाव तालुक्यातील वारी येथे महावितरणचे ३३ केव्ही वीज उपकेंद्र आहे. या उप केंद्रास कोपरगाव येथून वीज पुरवठा होतो. या अंतर्गत वारी, कान्हेगाव या गावांना वीज पुरवठा केला जातो. बुधवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे सवंत्सर येथे वीज वाहक तारांचा खांब तुटल्याने बुधवारी सायंकाळी सहा वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. मात्र सदरची लाईन ही गेल्या अनेक वर्षापासूनची असल्याने खांब, तारा जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे एकाची दुरुस्ती करायला गेल्यास नवीन खोळंबा उभा होत आहे. या गडबडीत ४८ तासांपासून वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे वीज पुरवठा कधी सुरळीत होईल हे सांगता येत नाही. दरम्यान दोन दिवसांपासून वीज नसल्याने ग्रामस्थांचे तसेच जनावरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. तरी तातडीने वीज पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
वारी, कान्हेगावचा तब्बल ४८ तासापासून वीज पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 5:44 PM