लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील पूर्वभागातील वारी ते सडे फाटा या १ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे २६ मे २०२० रोजी खुद्द आ. आशुतोष काळे यांनी नारळ फोडले होते. मात्र, उद्घाटनाला सात महिने उलटूनही अद्यापपर्यंत या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे हे काम नक्की होणार कधी? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
कोपरगाव तालुक्यातील राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या वारी गावच्या चोहोबाजूच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावात मोठा कारखाना आहे. तरीही गेली अनेक वर्षे या गावाला एकही रस्ता धड नाही. कोपरगाव-श्रीरामपूर या राज्यमार्ग- ३६ वरून वारीत येण्यासाठी सव्वातीन किलोमीटर रस्ता आहे. या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. आ. काळे यांनी स्थानिक विकास निधीअतर्गत १ किलोमीटर रस्त्याच्या कामाला १४ लाख ९९ हजार रुपयांचा निधी मंजूर करून मे महिन्यात कामाचे उद्घाटन केले. मात्र, सात महिने उलटूनही या रस्त्याचे काम झाले नाही. बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदारांना पावसाळा असल्यामुळे हे काम करता आले नाही, परंतु, पाऊस उघडल्यानंतर तत्काळ काम सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. दोन अडीच महिन्यांपासून पावसाने उघडीप दिली आहे. तरीही या रस्त्यावर खडीचा एकही ट्रॅक्टर पडलेला नाही. त्यामुळे रस्ते मंजूर होऊनही महिनोनमहिने होणार नसेल तर ते मंजूर करूनही काय उपयोग ? अशी संतापजनक भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
..........
वारी ते सडे फाटा या रस्त्याचे काम सात महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने तत्काळ या रस्त्याचे काम प्रजिमा १३ या रस्त्यापासून सुरू करून वारी तसेच सडे येथील नागरिकांना दिलासा द्यावा.
-मच्छिंद्र टेके, माजी सभापत, पंचायत समिती, कोपरगाव.
.........
फोटो३०- वारी – सडे रस्ता, कोपरगाव
...
ओळी-वारी ते सडे फाटावारी ते सडे फाटा या रस्त्याची झालेली दुरवस्था.