रमेश साबळे यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूर्ण केले. यानंतर नोकरी मिळत नाही हे पाहून त्याने बालपणापासून उपजत असलेली कला जोपासण्यासाठी विशेष प्रयत्न केला. त्यातून त्यांनी वारली पेंटिंग या विषयाचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पालघर जिल्ह्यातील नरेशवाडी येथील सोमय्या ट्रस्टच्या विद्यालयात पूर्ण केले. वारली कलेचे उपासक स्व. पद्मश्री जीवा सोमा म्हसे यांचेही रमेशला मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या सान्निध्यात आल्याने रमेशने वारली कलेचा आदर व स्वीकार केला आहे. रमेशच्या जीवनात यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. रमेश यांना शिक्षक दीपक सहारे व मंगेश वरठा यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. घरी चार ते पाच एकर शेतीवर कुटुंबाचा जीवनचरितार्थ चालविणे कठीण जात असल्याने जोडव्यवसाय व उद्योग उभारणे गरजेचे बनले असताना रमेशने कला अंगिकारली. अत्यंत मेहनतीने आत्मसात केलेली ही कला त्याने पाडोशीसारख्या छोट्या गावात विकसित करत गाठलेली मजल सर्वांनाच आश्चर्यचकित करते. ही कला जोपासताना त्याने अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत. त्यांतील त्याचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग म्हणजे विविध झाडांच्या बिया व शेंगा यांवर केलेल्या वारली कलेचा ठसा उमटविला.
भिंती, कापड, मातीची भांडी, कागद यांवरही अत्यंत सुबक अशी वारली कला त्यांनी साकारलेली आहे. त्याने साकारलेली चित्रे मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगलोरसारख्या शहरांमध्ये विकली जातात. त्यामुळे त्याची ही कलाच त्याचे उपजीविकेचे साधन बनले आहे.
.............
महिन्याला १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. या कलेचा योग्य तो आदर करून शासनाने मदत केल्यास बाजूच्या गावांतील तरुणांनाही रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देऊ शकेल.
२२ रमेश साबळे