अकोले : कोतूळ येथून पंधरा किलोमीटरवरील दुर्गम भागातील केळी गारवाडीत हरिश्चंद्रगड परिसरातील नवरदेवाचे मंगळवारी लग्न होते. मात्र नवरदेव व त्याच्या मित्रांनी दारू पिऊन राडा केल्याने नवरीकडील लोकांनी नवरदेवासह व-हाडाची चांगलीच धुलाई केली. त्यामुळे हे लग्न मोडलेच होते, पण पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी हा वाद मिटवून लग्न लावून दिले.तर्र झालेला नवरदेव, त्याच्या बरोबर वीस पंचवीस करवले. तरूण देखील यथेच्छ पिलेले. नवरदेव लग्न लावण्यासाठी मिरवणूक निघाली. लग्न मुहूर्त टळून गेला, तरीही नवरदेवासह त्याचे मित्र नाचण्याचे थांबत नव्हते. त्यामुळे नवरीकडील काही मंडळींनी त्यांची विनवणी केली, मात्र नशेत तर्र नवरदेवाने नवरीकडील चार पाच लोकांना बुट, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत शिव्यांची लाखोली वाहिली. मात्र नवरीकडील लोकांचा संयम सुटल्याने नवरदेव व त्याच्या वीस पंचवीस मित्रांना यथेच्छ चोप दिला. नवरदेवाच्या मुंडावळ्या काढून घेत त्याचे लग्नाचे नवे कपडे देखील फाडून टाकले. बेदम हाणामारी पाहून गावातील पोलीस पाटलाने पाच किलोमीटर अंतरावर मोबाईल रेंज असलेल्या ठिकाणाहून कोतूळ पोलीस ठाण्यात सहायक फौजदार सुनील साळवे यांना माहिती दिली. साळवे यांनी आदिवासी सेवक पांडुरंग कचरे यांना घेऊन केळी गारवाडी गाठली. त्यांनी बैठक घेऊन दोन्ही बाजूची समजूत घातली. मात्र नवरी देखील लग्नाला तयार होत नव्हती. शेवटी नवरदेवाने नवरीची माफी मागितल्यानंतर वाद मिटला तोपर्यंत पोलिसांना पाहून डिजे व भटजी पळून गेले. केवळ दोनचार मंगलाष्टके घेत आदिवासी सेवक पांडुरंग कचरे यांनी भटजींची भूमिका वठवित हा सोहळा पार पाडला.