अहमदनगर : महावितरण कंपनीकडून शनिवारी (दि.२१)मुळा धरणावरील वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच दिवशी पाणी योजनेवरील दुरुस्तीची कामेही हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे पाण्याच्या टाक्या भरता येणार नसल्याने रविवार आणि सोमवारी शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार असून मंगळवारी (दि.२४) पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.एमआयडीसी १३२ के.व्ही. उपकेंद्र ते मुळा धरण ३३ के.व्ही. उपकेंद्र या दरम्यानच्या वीज वाहिनीमध्ये तांत्रिक देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. या दुरुस्तीच्या कामासाठी मुळा धरणा वाहिनीवरील वीज पुरवठा शनिवारी (दि. २१) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत बंद करण्यात येणार आहे. याचवेळी महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेवरील दुरुस्तीचीही कामे हाती घेतली जाणार आहेत. हे कामही शनिवारी (दि.२१) दिवसभर सुरू राहणार आहे. या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार आहे. त्यामुळे शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नसल्याने संपूर्ण शहराचा पाणी पुरवठाच बंद राहणार आहे.रविवारी (दि.२२) सर्जेपुरा, तोफखाना, सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगाव, चितळे रोड, ख्रिस्त गल्ली, माळीवाडा, बालिकाश्रम रोड, सावेडी आदी भागास महापालिकेमार्फत पाणी पुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणी पुरवठा हा रविवारऐवजी सोमवारी (दि.२३) करण्यात येणार आहे.सोमवारी (दि.२३) मंगलगेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, दाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा, कोठी, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हिल हडको, प्रेमदान हडको, म्युन्सिपल हडको आदी भागात पाणी पुरवठा होणार नाही. या भागात मंगळवारी (दि.२४) पाणी पुरवठा होईल. शहरातील पाणी पुरवठा बंद करून उपनगरात ज्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले आहे, अशा भागात पाणी पुरवठा करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेवून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे..