अहमदनगर : जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोल्हापूर पद्धतीने बंधारे बांधण्यापूर्वी त्या ठिकाणी पाणी वापर संस्था स्थापन करण्याचे सक्त आदेश जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे यांनी दिले आहेत. पाणी वापर संस्था स्थापन न करता कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधल्यास त्याची जबाबदारी संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार असल्याचे कोल्हे यांनी बजावले आहे. ३ फेबु्रवारी २०१६ ला झालेल्या लोकलेखा समितीच्या साक्षीत जिल्ह्यात जलआराखडा न बनवता लघुसिंचनाची कामे मंजूर केल्याबद्दल समितीच्या सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यापुढे सक्तीने जलआराखडे बनविल्याशिवाय नवीन सिंचनाची कामे घेवू नयेत, असे आदेश दिलेले आहेत. जलआराखडा तयार करताना त्या भागात यापूर्वी झालेली जलसंधारणाची कामे, तेथे पडणारा पाऊस, गावातील पाण्याच्या टँकरची स्थिती आदी बाबींचा समावेश त्यात करण्यात यावा. या जलआराखड्याला जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीपुढे मांडून त्यातून टंचाईग्रस्त गावांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच २००० च्या शासन निर्णयानुसार पाणी वापर संस्था स्थापन केल्याशिवाय कोल्हापूर पद्धतीने बंधारे घेण्यात येऊ नयेत, परवानगी दिल्यास संबंधीत शाखा अभियंता आणि कार्यकारी अभियंत्यांवर राहणार आहे. संबंधीत बंधारे गेट चोरीस गेल्यास तत्काळ पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कोल्हे यांच्या आदेशात स्पष्ट करण्यात आले. नव्याने या ठिकाणी गेटची खरेदी न करण्याच्या त्यांच्या सूचना आहेत. (प्रतिनिधी)
कोल्हापूर बंधाऱ्यासाठी पाणी वापर संस्था सक्तीची
By admin | Published: March 13, 2016 11:41 PM