श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन पिण्यासाठी येडगाव धरणातून सहा जुनला सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कुकडीचे अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी ‘लोकमत’ला दिली. काही दिवसापुर्वी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनाबाबत सर्व अधिकार जलसंपदा मंत्री जयंत पाटील व अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांना देण्यात आले होते. शनिवारी सकाळी धुमाळ यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली व कुकडीच्या आवर्तनाचा निर्णय घेतला. आता कालवा सल्लागार समितीची बैठक होणार नाही. एक जूनपासून पिंपळगाव जोगेच्या डेड स्टॉकमधून येडगावमध्ये पाणी फिडिंग करण्यात येणार आहे. सहा जूनला पाणी येडगाव धरणामधून पाणी सोडण्यात येणार आहे. टेल टु हेड पध्दतीने आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. ---डिंबेचे पाणी नाही! डिंबे लाभक्षेत्रात आवर्तन चालू आहे. त्यामुळे डिंबेचे पाणी येडगाव धरणामध्ये येणार नाही. पिंपळगाव जोगे धरणातील डेड स्टॉकवर नगर सोलापुरला पाणी देण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.---पाचपुते-शिंदेचा दणका शुक्रवारी माजी मंत्री बबनराव पाचपुते व प्रा. राम शिंदे यांनी कुकडीच्या आवर्तनावर एक जुनपासुन उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली झाल्या आणि कुकडीचे आवर्तन सोडण्यावर शासनाने निर्णय घेतला.
कुकडीचे आवर्तन सहा जूनपासून सुटणार, येडगाव धरणातून सोडणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 4:35 PM