कोपरगाव : तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदेकसारे येथील आनंदवाडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाली. त्यात सहाशे लोकवस्तीच्या शंभर घरांना त्याचा तडाखा बसला. संजीवनी आपत्ती निवारण पथकाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी रेस्क्यू आॅपरेशन राबवून या नागरिकांची सुटका केली. परिणामी जीवितहानी झाली नाही. मात्र त्यात गायी व वीस शेळ्यांना जीव गमवावा लागला.अचानक आलेल्या पाण्यामुळे लहान मुले, मुली भयभीत झाले होते. पाण्याचा वेग एवढा प्रचंड होता, की आनंदवाडी येथील रहिवाशांच्या घरात साडेपाच फूट उंच पाणी साठून वाहत होते. पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचला असून, संसारोपयोगी वस्तू ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे नागरिकांना गुरुवारची रात्र डोक्यावर घेत जागून काढावी लागली.दरम्यान, शुक्रवारी आ. स्नेहलता कोल्हे, तहसीलदार किशोर कदम, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, कृषी अधिकारी अशोक आढाव व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळास भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आ.कोल्हे यांनी तातडीने पंचनामे करून आवश्यक ती शासकीय मदत आपत्तीग्रस्तांना देण्याच्या सूचना दिल्या. पोहेगाव पर्जन्यमापक केंद्रात गुरुवारी पडलेल्या पावसाची ७३ मिलिमीटर अशी नोंद झाली आहे.या भागातील रहिवाशांनी यापूर्वी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी कधीही पाहिली नव्हती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आनंदवाडीतील आपत्तीग्रस्त नागरिकांना तूर्त चांदेकसारे येथील शाळेत पुनर्वसीत करून येथील गाळ व मृत जनावरे जेसीबीच्या साह्याने बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आ. कोल्हे यांनी घटनेची सर्व माहिती जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना दिली आहे.
कोपरगावातील शंभर घरांमध्ये घुसले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 11:34 AM