बोधेगाव : रणरणत्या उन्हात वाटसरूंची तहान भागावी, यासाठी शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील युवकाने माणुसकीच्या नात्याने स्वखर्चातून मोफत पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई साकारली आहे. तसेच पक्ष्यांसाठीही धान्य व पाण्याची व्यवस्था केली आहे.
बोधेगाव (ता. शेवगाव) हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. येथील आठवडा बाजार, दवाखाने, बँक, पेट्रोल पंप, बाजार उपसमिती तसेच इतर खरेदी-विक्री कामांसाठी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसह नागरिकांची याठिकाणी ये-जा सुरु असते. परिसरात उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईमुळे सर्वसामान्य वाटसरूंना घोटभर पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील बनते. अशा परिस्थितीत येथील सामाजिक कार्यकर्ते सदानंद गायकवाड यांनी पैठण - पंढरपूर मार्गावरील हातगाव रस्त्याला राहत्या घरानजीक वाटसरूंसाठी विनाशुल्क थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. यासाठी त्यांनी स्वखर्चातून सहा मातीचे माठ ठेवता येतील, असे एक लोखंडी स्टॅण्ड बनवून घेतले आहे. तसेच माठांवर सावलीसाठी कापडी छत तयार केले. पक्ष्यांसाठीही पाणपोई स्टॅण्डलाच प्लास्टिकच्या लहान कटोऱ्या बांधून त्यात धान्य व पाण्याची सोय केली आहे. या पाणपोईमध्ये नियमित पाणी भरणे, माठ व परिसर स्वच्छता आदी कामे गायकवाड यांच्या कुटुंबातील महिला, चिमुकली मुले व अन्य सदस्य आवडीने करतात.
--
पाणपोईच्या माध्यमातून मी व माझे कुटुंबीय माणुसकी जपण्याचे छोटेसे काम करत आहोत. ही पाणपोई तयार करण्यासाठी मला खरी प्रेरणा माझ्या लहान मुलीकडून मिळाली.
- सदानंद गायकवाड
सामाजिक कार्यकर्ते, बोधेगाव.
---
२४ बोधेगाव पाणपोई
बोधेगाव येथील पालखी मार्गावर सामाजिक कार्यकर्ते सदानंद गायकवाड यांनी वाटसरूंसाठी पाणपोई उभारली आहे.