अहमदनगर : कल्याण रोड परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने वसंत टेकडी येथे दहा अश्वशक्तीचा विद्युत पंप बसविला. परंतु, या भागातील पाणीप्रश्न कायम असल्याने येत्या २० एप्रिलपर्यंत हा प्रश्न न सुटल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा सेनेचे नगरसेवक सचिन शिंदे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या अर्थसंकल्पीय सभेत शिंदे यांनी महापौर वाकळे यांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरातील पाणीप्रश्नासाठी वेळोवेळी मोर्चे आंदोलने, उपोषण केले. परंतु केवळ लेखी आश्वासन देण्यात आली. त्यावर कुठलीही कार्यवाही झाली नाही. महापालिकेने कल्याण रोड परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी १० अश्वशक्तीचा विद्युत पंप बसविला. परंतु, आजही या भागात १० ते १२ दिवसांनी पाणीपुरवठा होतो. आयुक्तांना १५ दिवसांत निविदा प्रक्रिया राबविण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु, याबाबत प्रशासनाकडून माहिती घेतली असता निविदा प्रक्रियेची कार्यवाही अद्याप केली गेली नसल्याचे समजले. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असून, येत्या २० एप्रिलपर्यंत या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा महापालिकेत आत्मदहन करणार असल्याचा इशारा शिंदे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.