---------------
समाजकंटकांवर कारवाईची मागणी
अहमदनगर : जनरक्षणाचे कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर संगमनेर येथे झालेला हल्ला हा समाजाच्या संरक्षक भिंतीवर झालेला हल्ला आहे. ही घटना अतिशय खेदजनक आहे. या घटनेचा जिल्ह्यातील सराफ सुवर्णकार संघटनेने तीव्र निषेध केला आहे. जिल्ह्यातील व्यापारी वर्ग पोलीस प्रशासनाच्या मागे ठामपणे उभा आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात पोलीस प्रशासनाला मदत करणे हे सर्व जनतेचे कर्तव्य आहे. पोलिसांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर तातडीने कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जिल्हा सराफ सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
-------------
बँकांमधील कर्मचाऱ्यांना लस देणार
अहमदनगर : अत्यावश्यक सेवेत समाविष्ट असलेल्या सर्व राष्ट्रीयीकृत, सहकारी, खाजगी बँका व पतसंस्थेत कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांचे कोरोना लसीकरण होण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे सहकार्य करण्याची मागणी शिवसेना व जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीने करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सर्व बँक कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. याची सुरुवात १० मे पासून शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर होणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संदीप वालावलकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
-------------