राहुरी : उत्सुकता निर्माण झालेल्या मुळा धरणात आज सकाळी दहा वाजेपर्यत २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे. यामुळे नदीपात्रात आज दुपारी ४ वाजता धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. त्यादृष्टीकोनातून पाटबंधारे खात्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात बुधवारी २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणी साठ्याची नोंद झाली आहे. धरणाकडे १३ हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे पाण्याची आवक ५२ क्युसेकवरून १३ हजार क्युसेकवर खाली घसरली आहे.मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर गेल्या दहा, बारा दिवसामध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणात समाधानकारक पाण्याची आवक झाली. मंगळवारी कोतूळ येथे ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. आतापर्यंत कोतूळ येथे ६२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुळानगर येथे आतापर्यंत १७५ मिली पावसाची नोंद झाली आहे. पाणलोट क्षेत्रावर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मुळा नदीपात्रात असलेल्या विद्युत मोटारी काढण्याचे काम शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. मुळा नदीमध्ये असलेले बंधारे कोरडेठाक पडले आहेत.मुळा धरणाची बुधवारी पाहणी केली आहे. धरणात समाधानकारक पाणीसाठा नव्याने आला आहे. पाटबंधारे खात्याकडून माहिती आल्यानंतर मुळा नदीकाठावर असलेल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात येणार आहे - एफ. आय.शेख, तहसीलदारमुळा धरणात २२ हजार ९६७ दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला आहे़ २३ हजार ५०० दशलक्ष घनफूट पाणी झाल्यानंतर मुळा नदी पात्रात चार वाजता धरणाच्या ११ मो-यातून पाणी सोडण्यात येणार आहे़ पाटबंधारे खाते पाण्याच्या पातळीकडे लक्ष ठेऊन आहे़ -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग
आज सुटणार मुळा नदीपात्रात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:28 PM