संगमनेर : पठार भागातील मुळा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या सख्ख्या मावस भावंडांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना येठेवाडी येथे घडली. याप्रकरणी घारगाव पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. पोलिसांची माहिती अशी, शाळेला सुट्टी लागल्याने अमोल गोरख भांड (वय १३, रा. वेल्हाळे) हा त्याचा सख्खा मावस भाऊ अरूण बाळासाहेब रोडे (वय १४, रा. येठेवाडी) याच्याकडे आला होता. सध्या ‘मे’ महिन्याच्या उष्णतेने प्रचंड उकाडा निर्माण झाला असून मुळा नदीतील पाण्यात पोहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दोघे भावंड पोहण्यासाठी नदीवर गेले. नदी पात्रातील प्रचंड खोली असलेल्या डोहात दोघांनी उड्या मारल्या. परंतु खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड केली. काहींनी पाण्यात उड्या घेत शोधाशोध सुरू केली. मात्र अर्ध्या तासानंतर दोघा भावांचे मृतदेह एकाच ठिकाणी सापडले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आले. याप्रकरणी संपत रोडे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे. मयत अमोल भांड हा इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता, तर अरूण रोडे हा आठवीत उत्तीर्ण होऊन नववीत गेला होता. (प्रतिनिधी)
मावस भावंडांना जलसमाधी
By admin | Published: May 19, 2014 11:38 PM