रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुखसह परिसरातील धोंडेवाडी, मानेगांव, वेस, सोयगांव व बहादपूर या गावांना सध्या पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असून गावातील उद्भव आटल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. किमान आठवड्यातून ५०० रुपये खर्च करण्याची वेळ ग्रामस्थांवर आले आहे. टँकरचे प्रस्ताव देवूनही टँकर सुरू होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या सर्व गावात उन्हाळ्यात मोठ्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन वापरासाठी व पशुधनासाठी पाण्याची गरज भासत आहे. पाणी मिळविण्यासाठी कुटुंबातील महिलांना व पुरुषांनाही भटकंती करावी लागत आहे. तसेच वेळ पडल्यास पाण्यासाठी पैसेही मोजावे लागत आहे. रांजणगाव देशमुखसह परिसरातील पाच गावांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी पोहेगाव येथून गेलेल्या पाटाचे पाणी पाईपलाईनद्वारे धोंडेवाडी येथील तलावात आणण्याची योजना आहे. मात्र वीजपंपाला लागणाऱ्या विजेचे सुमारे ३० लाख रुपये बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती थांबणार तरी कधी? असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. यासंदर्भात कोपरगाव तहसीलदार यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही.
एक-दीड महिन्यापासून परिसरात टँकर सुरू करावे, या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला आहे, परंतु यावर अद्यापपर्यंत कोणतीच कार्यवाही झालेली नाही. सध्या ग्रामस्थ भिषण पाणी टंचाईचा सामना करीत आहे. मागणी करून महिना उलटून गेला तरी कोणतीच कार्यवाही न झाल्याणे शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे असा आमचा आरोप आहे. - संदीप रणधीर, सरपंच, रांजणगावसदर गावचा टँकर मागणीचा प्रस्ताव गेल्या आठ दिवसापूर्वी मला मिळाला आहे. त्याची आमच्यास्तरावरील सर्व पूर्तता करीत तहसीलदार यांच्याकडे पाठवला आहे. त्यामुळे हा विषय त्यांच्या स्तरावर आहे. - कपीलनाथ कलोडे, गटविकास अधिकारी,पंचायत समिती, कोपरगाव .
सध्या ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. अनेक वेळा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. किमान आठवड्याला ५०० रूपयांचे पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. प्रशासनाने तत्काळ टँकर सुरु करावा. - गोरक्षनाथ वर्पे, नागरिक रांजणगाव देशमुख, ता.कोपरगाव. देशमुख, ता.कोपरगाव.