राहुरी : मुळा धरणातून शनिवारी (दि.१६) सायंकाळी सहा वाजता उजव्या कालव्यातून पाचशे क्युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुळा पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांनी ‘लोकमत’'शी दिली.
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात २५ हजार ६५० दशलक्ष घनफूट (९८.६५ टक्के) पाणी शिल्लक आहे. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले होते. उजव्या कालव्यातूनही रब्बी पिकासाठी आज सायंकाळी पाणी सोडण्यात येणार आहे. मुळा उजव्या कालव्या खाली ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, ऊस, फळबाग, घास कांदा इत्यादी पिकांना दिलासा मिळणार आहे.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शनिवारी सायंकाळी शेतीसाठी ५०० क्युसेकने आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. उजव्या कालव्या खालील सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून आवर्तन साधारण ४० दिवस चालणार आहे.
-सायली पाटील, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.