राहुरी : महावितरणचे वीज रोहित्र जळण्याचे प्रकार वाढल्याने राहुरी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. जुना कणगर रस्ता परिसरात असलेल्या भिंगारकर रोहित्र गेल्या तीन आठवड्यांपासून जळाल्याने ऊस, घास, गहू पिके धोक्यात आली आहेत. दोनशे एकरावरील पिके जळण्याच्या मार्गावर आहेत. महावितरणने लक्ष न दिल्यास कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारा मंगळवारी शेतक-यांनी दिला.भिंगारकर रोहित्रावर ३५ वीज जोड आहेत. दीड महिन्यात हे रोहित्र दुस-यांदा जळाले. गेल्या तीन आठवड्यांपासून पुन्हा रोहित्र जळाल्याने शेतक-यांनी महावितरणाला रोहित्र दुरूस्ती करण्यासंदर्भात विनंती केली. शेतक-यांनी वीज देयके भरल्याची झेरॉक्सही महावितरणकडे दिली. मात्र महावितरणने लक्ष न दिल्याने पाणी असूनही शेतातील उभी पिके जळतांना बघण्याची नामुष्की शेतक-यांवर आली आहे.रोहित्र दुरूस्तीसाठी महावितरणकडून अहवाल हवा असतो. मात्र महावितरणने अहवाल न दिल्याने नादुरूस्त रोहित्र शेतातच आहे. रोहित्र काढून नवीन रोहित्र मिळणे गरजेचे आहे. रोहित्र दुरूस्त करण्याची सुविधा राहुरी येथे नाही. त्यामुळे थेट बाभळेश्वरला रोहित्र घेऊन जावे लागते. त्यानंतर शेतक-यांना दुसरे रोहित्र दिले जाते. रोहित्र पोहच करण्यासाठी शेतक-यांनाच महावितरणच्या कर्मचा-यांना वाहन पुरवावे लागते. श्रीरामपूर, बाभळेश्वर किंवा बाभूळगाव येथे पर्यायी रोहित्र उपलब्ध होते. राहुरी येथे मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर रोहित्र जळत असताना स्थानिक पातळीवर रोहित्र उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासंदर्भात महावितरणच्या उपअभियंत्याशी संपर्क साधला असता ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले.
उसाचे पीक ३० कांडयांवर आले आहे. मात्र गेल्या तीन आठवड्यांपासन रोहित्र नादुरूस्त आहे. त्यामुळे पीक जळू लागले आहे. परिसरातील शेतक-यांचे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी वीज बिल भरूनही महावितरण दखल घेत नाही़ रोहित्र दुरूस्तीसाठी शेतक-यांना बरेच दिवस वाट पहावी लागते. दुरूस्तीसाठी राहुरी येथे सुविधा उपलब्ध पाहिजे. विजेचा प्रश्न न सोडविल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही.-मुरलीधर वराळे, ऊस उत्पादक शेतकरी.