शिर्डी : ‘हम भी दिखायेंगे हम भी नही कुछ कम’, अशा शायरी अंदाजात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या ट्विटला उत्तर दिले. ईडीची नोटीस आल्यानंतर राऊत यांनी ‘आ देखे जरा किसमे कितना है दम’, असे ट्विट केले होते.
सोमवारी (दि.२८) शिर्डीत आरपीआयच्या उत्तर महाराष्ट्रातील कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विजय वाकचौरे, काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, रमेश मकासरे, विश्वनाथ काळे, प्रकाश जोरे, दीपक गायकवाड, राजाभाऊ कापसे, राहुल वाघमारे, सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, सुनील साळवे आदींची उपस्थिती होती.
महाविकास आघाडीत मतभेत आहेत. हे सरकार पाच वर्षे टिकू शकत नाही. उद्धव ठाकरे जर पुन्हा एनडीएत आले तर त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्री करण्यासाठी भूमिका घेण्याबाबत आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करू, असे आठवले म्हणाले. उद्धव ठाकरे जास्त दिवस महाविकास आघाडीसोबत राहिल्यास शिवसेनेतही फूट पडण्याची शक्यताही आठवले यांनी व्यक्त केली.
पश्चिम बंगालमध्ये आरपीआय अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर काम करत आहे़ आम्ही भाजपबरोबर निवडणूक लढवणार आहोत. भाजपला दोनशे जागा मिळतील, असे भाकित त्यांनी केले. भाजपने आम्हाला पश्चिम बंगालमध्ये १० जागा द्याव्यात, अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षात काही प्रमाणात गटबाजी आहे. मात्र, ती लवकरच दूर होईल. आजची बैठक त्याकरिताच असल्याचे आठवले म्हणाले. सदस्यसंख्या वाढविण्यावर भर देण्यात येणार असून जे कार्यकर्ते सदस्यवाढीसाठी काम करणार नाहीत, त्यांना पदमुक्त करू. ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक आघाडीसोबत जावे. मात्र, महाविकास आघाडीसोबत जावू नये, अशी रिपाइंची भूमिका असल्याचे आठवले यांनी सांगितले.
....
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळेल
मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत न्यायालयात ठाकरे सरकारने व्यवस्थित बाजू मांडली नाही. मराठा समाजाला ओबीसी समाजात आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे. सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले.
...
शिर्डीतून पुन्हा लढण्याचे संकेत
मी शिर्डीमध्ये पुन्हा येईल.. असे म्हणत रामदास आठवले यांनी भविष्यात पुन्हा शिर्डी लोकसभा लढण्याचे संकेत दिले.