नेवासा फाटा (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी नेवासा फाटा येथे समाज बांधवांचे नऊ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. गुरुवारी सकाळी ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला अखेरचा जय मल्हार’, असे चिठ्ठीत नमूद करून दोन आंदोलक गायब झाले आहेत.
यातील एका आंदोलकाची कार, तसेच दोघांच्याही चपला अहमदनगर - छत्रपती संभाजीनगर मार्गावरील प्रवरासंगम येथील नदीच्या पुलावर आढळल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिवसभर त्यांचा गोदावरी नदी पात्रात शोध घेतला. मात्र रात्रीपर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता.
दोघे आंदोलक गायब झाल्याचे समजताच धनगर समाज बांधवांनी प्रवरासंगम येथे पुलावरच दीड तास रास्ता रोको आंदाेलन केले. बाळासाहेब कोळसे (रा. आडगाव, ता. पाथर्डी) व प्रल्हाद चोरमारे (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी गायब झालेल्या आंदोलकांची नावे आहेत.
कोळसे, चोरमारे गुरुवारी सकाळी प्रात:विधीला जाऊन येतो, असे सांगून उपोषणस्थळावरून निघून गेले. त्यानंतर त्यांनी एका कार्यकर्त्याला फोन केला. ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार’ असे सांगून फोन बंद केला. ही माहिती आंदोलकांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला.
कारच्या सीटवर ठेवले मोबाइल
गोदावरी पुलावर प्रल्हाद चोरमारे यांची कार उभी असल्याचे दिसून आले. कारच्या डॅश बोर्डवर चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांनी मोबाइल सीटवर ठेवलेले आहेत. कार लॉक केलेली आढळून आली.
त्यानंतर कोळसे व चोरमारे यांचा पोलिस आणि महसूल विभागाने पाण्यामध्ये शोध सुरू केला. रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता. या आंदोलकांच्या शोधासाठी एनडीआरएफची तुकडी बोलावण्यात आली आहे.