अरुण वाघमोडे
अहमदनगर : चौकात वाहतूक कर्मचारी उभा असो अथवा नसो बहुतांश बेशिस्त वाहनचालक सर्रास रेड सिग्नल जम्पिंग करून वाहतूक नियमांचा भंग करत असल्याचे नगर शहरात दिसत आहे. वाहनचालकांची ही अतिघाई बहुतांशवेळा अपघातास निमंत्रण देणारी ठरत आहे. पोलिसांनी दंड केल्याशिवाय वाहनचालकांना नियमांची आठवण होतच नाही, अशीच परिस्थिती आहे.
नगर शहरात प्रेमदान चौक, पत्रकार चौक, डीएसपी चौक, मार्केट यार्ड, स्टेट बँक चौक, चांदणी चौक आदी ठिकाणी वाहतुकीच्या नियमनासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित आहे. हे सर्वच चौक महामार्गावर असल्याचे येथे दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते. काही चौकांत वाहतूक कर्मचारी नसले तरी सिग्नल यंत्रणा मात्र अपवाद वगळता निर्धारित वेळेप्रमाणे कार्यरत राहते. रेड सिग्नल पडल्यानंतर समोरील बाजूचे वाहनचालक थांबतात. थांबलेल्यांपैकी तीन ते चार वाहनचालक मध्येच वाहन प्रवेश करतात. अशावेळी दुसऱ्या बाजूने येणारे वाहनचालकही गोंधळून जातात. शहरातील चांदणी चौक, प्रेमदान चौक व पत्रकार चौकात सर्वाधिक जास्त वाहनचालक रेड सिग्नल जम्प करत असल्याचे लोकमतने केलेल्या रिॲलिटी चेकमधून समोर आले आहे. वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या अशा वाहनचालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
----------------------------------------
सिग्नलवर दोन ते तीन मिनिटे थांबल्याने काहीच फरक पडत नाही. मात्र, काही वाहनचालक विनाकारण घाई करून नियम तोडतात. यामुळे अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे अशा वाहनचालकांवर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.
-काकासाहेब अंत्रे, वाहनचालक
-----------------------------------------
वाहतूक नियम हे वाहनचालकांच्या सुरक्षेसाठीच असतात. त्यामुळे या नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे सिग्नलसह सर्वच ठिकाणी नियम पाळणे गरजेचे आहे. मी स्वत: वाहन चालविताना हे नियम पाळतो.
- संतोष काेळेकर, वाहनचालक
--------------------------------------------
रोज २५ वाहनचालकांना दंड
शहरात सिग्नल जम्प करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाई केली जात आहे. हा दंड ऑनलाइन केला जातो. दिवसभरात २० ते २५ वाहनचालकांना दंड केला जात आहे.
अपघात टाळण्यासाठी प्रत्येक वाहनचालकाने रस्त्यावर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. जे वाहनचालक नियम पाळत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. येणाऱ्या काळात या कारवाईच्या प्रमाणात वाढ केली जाणार आहे.
- विकास देवरे, नगर शहर वाहतूक निरीक्षक
फोटो २२ वाहतूक
२२ सिग्नल