पाथर्डी : आमदारकीच्या पाच वर्षाच्या काळात केवळ विकासाचे राजकारण केले. कधी गावागावात भांडणे झाली नाहीत. आम्ही कधी आडवाआडवीचे राजकारण केले नाही, असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले.पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील शेकटे, फुंदेटाकळी, पिंपळगव्हाण, येळी, मिडसांगवी, भारजवाडी, भालगाव, खरवंडी कासार आदी गावात राजळे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. राजळे बोलत होत्या. त्यांच्या समवेत भाजपचे तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खेडकर, सोमनाथ खेडकर, भीमराव फुंदे, सुभाष केकाण, महादेव जायभाय, संजय किर्तने, भगवान आव्हाड, पाराजी किर्तने आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.राजळे म्हणाल्या, आमच्या कुटुंबावर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळला, त्यावेळेस पंकजा मुंडे यांनी मला सावरले. ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे व स्व. राजाभाऊचे कार्यकर्ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. मला ऊर्जा दिली. तुम्ही सगळे माझ्यामागे उभे असल्यामुळे मी आता एकटी राहिलेली नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.राजळे म्हणाल्या, सावरगाव येथील दसरा मेळाव्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची ताकद किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे पंकजातार्इंना ताकद देणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांच्या माणसांच्या मागे आपली शक्ती उभी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
आम्ही आडवाआडवीचे राजकारण केले नाही-मोनिका राजळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 6:02 PM