जामखेड : पुणे जिल्ह्यातून पाणी आणायचे म्हणजे जबड्यात हात घातल्यासारखे आहे. ते काम पालकमंत्री राम शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आम्हाला बाहेरचे उसने नको आहे. आमचचं आम्हाला पाहिजे. बाहेरच्या लोकांचे कौतुक कशाला करायचे? ज्यांनी दबावाचे राजकारण केले. राजकीय स्वार्थ पाहिला. जिल्ह्याचे पाणी अडवले? त्यांना लोकसभा निवडणुकीत चपराक मिळाली, अशी टीका गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी राष्टÑवादीचे नेते शरद पवार व रोहित पवार यांचे नाव न घेता केली. जामखेड नगरपरिषदेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्याभूमिपूजन राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विखे बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राम शिंदे होते. नगर जिल्ह्याचा वापर फक्त त्यांनी राजकारणासाठी केला. पुणे जिल्ह्यात नगरचे पाणी अडवून राष्ट्रवादीने नगर जिल्ह्याची राखरांगोळी केली आहे. आता परजिल्ह्यातील पार्सल येथे नको आहे. आम्ही सक्षम आहोत. कर्जत जामखेडमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम करून राजकारण केले जात आहे. पालकमंत्री राम शिंदे यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकास कामे केली आहेत. राम शिंदे तुमच्याबरोबर आम्ही आहोत. त्यामुळे चिंता करू नये. परजिल्ह्यातील आक्रमण भिरकावून देऊ. जिल्ह्यावर होत असलेला अन्याय दूर करू. म्हाडाच्या पुढाकाराने पहिली योजना जामखेडला सुरू करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले. राम शिंदे म्हणाले, येथे कोणी येऊन काम कमी व गप्पा जास्त मारण्याचे काम करीत आहे. यातून प्रचाराचे काम चार महिन्यांपासून काम सुरू आहे. दुर्लक्षीत भागाला यांनी सत्ता असताना कधी न्याय दिला नाही. आम्ही विकासाचा लेखाजोखा मांडला आहे. जनता सुज्ञ आहे ते योग्य निवाडा करतील, असा आशावाद व्यक्त केला.
बाहेरच्या लोकांचं कौतुक कशाला करायचं?; राधाकृष्ण विखेंचा शरद पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 11:37 AM