सैन्यदलामध्ये अधिकाऱ्यांपासून ते साध्या जवानांपर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. लढणा-या सैनिकांना वाहनातून घेऊन जाणा-या चालकालाही सैनिकासारखेच धैर्यवान असावे लागते. बाबासाहेब कावरे यांनी आपल्या वीरमरणातून तेच दाखवून दिले. उल्फा अतिरेक्यांशी लढणा-या सैनिकांना घेऊन जाताना अतिरेक्यांनी त्यांना ‘टार्गेट’ केले. गोळ्या शरिरात घुसल्या असतानाही त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले व मगच देह ठेवला.बाबासाहेब कावरे हे पारनेरमधील वरखडे मळ्यातील शेतकरी सखाराम कावरे व इंदुबाई कावरे यांचे देशाच्या कामी आलेले थोर सुपुत्र. बाबासाहेब याचा जन्म एक जून १९७६ मध्ये झाला पहिली ते चौथी पारनेर येथीलच मराठी शाळेत झाले. पाचवी ते दहावी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आणि अकरावी व बारावी पारनेर महाविद्यालयातून पूर्ण केले. सैन्यदलात भरती होण्याची इच्छा असल्याने बाबासाहेब यांनी दररोज सकाळी तीन ते चार किलोमीटर रनिंग करणे व इतर व्यायाम सुरू ठेवला होता. घरची शेती ही केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता, हे बाबासाहेब जाणून होते. त्यामुळे भरती होण्याचे ध्येय ठेवून त्यांनी तयारी सुरु केली. सैन्यदलात भरती होण्यासाठी मित्रांसमवेत त्यांनी पुणे गाठले. ३० आॅक्टोबर १९९६ हा त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा दिवस ठरला. त्यांना भारतमातेची सेवा करण्याची संधी मिळाली. ते सैन्यदलात दाखल झाले. बाबासाहेब देशाची सेवा करण्यासाठी सैन्य दलात रुजू झाल्यानंतर त्याचे वडील सखाराम, आई इंदुबाई व छोटा भाऊ अशोक यांनाही आनंद झाला. त्यांच्या मित्रांनी तर त्यांचा सन्मानही केला होता. हैदराबाद येथे त्यांचे लष्करी प्रशिक्षण झाले.पॅरा ट्रेनिंग सेेंटरवर वर्षभराचा खडतर अभ्यास पूर्ण केल्यानंतर त्यांना हैदराबाद येथेच नियुक्ती देण्यात आली. याच काळात त्यांचा विवाह स्वाती यांच्याशी झाला.सव्वा वर्षांतच कोमेजला संसारउल्फा अतिरेक्यांशी लढताना बाबासाहेब शहीद झाले, ही वार्ता पारनेरमध्ये धडकताच कावरे कुटुंब शोकसागरात बुडाले. अवघ्या सव्वा वर्षाच्या संसाराचे सारथ्य केलेले पती शहीद झाल्याचे समजताच पत्नी स्वाती यांनी मोठ्याने टाहो फोडला़ कावरे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला़ शहीद जवान बाबासाहेब यांचे पार्थिव पारनेर तहसील कार्यालयाजवळ आणण्यात आले. सजवलेल्या ट्रॅक्टरमध्ये त्यांचे पार्थिव ठेवून मिरवणूक काढण्यात आली़. ‘बाबासाहेब कावरे अमर रहे, भारत माता की जय’च्या अशा अबालवृद्धांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. दोन किलोमीटर मिरवणूक झाल्यानंतर कावरे मळ्यात त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकवीस नोव्हेंबरचा थरारहैदराबाद येथून बाबासाहेब कावरे यांची आग्रा येथे बदली झाली़ पुढे त्यांना आसाम राज्यातील गुवाहाटी भागात संरक्षणासाठी पाठवण्यात आले. गुवाहाटी हे आसाम राज्याच्या राजधानीचे आणि ब्रम्हपुत्रा नदीकाठी वसलेले शहर. विस्तीर्ण जंगलाचा हा प्रदेश. त्यामुळे या भागात उल्फा या अतिरेकी संघटनेच्या कारवाया वाढल्या होत्या. मणिपूरच्या सीमेकडून उल्फा संघटनेच्या अतिरेक्यांची घुसखोरी सुरु केलेली होती. भारतीय जवानांवरही या संघटनेकडून थेट हल्ले होत होते़.एकूणच हा सारा प्रदेश अशांत होता. याच प्रदेशात अतिरेक्यांशी लढण्यासाठी बाबासाहेबांची बदली करण्यात आली होती़.त्यावेळी त्यांचे लग्न होऊन केवळ सव्वा वर्षांचा काळ लोटला होता. पण त्यांनी देशाहिताला प्राधान्य देत गुवाहाटी गाठले. तो २१ नोव्हेंबर २००० सालचा मंगळवार होता. गुवाहाटी येथून भारतीय सैन्याची एक तुकडी दहा ते अकरा वाहनांमधून मणिपूर सीमेच्या दिशेने कूच करीत होती. उल्फा अतिरेक्यांचा खात्मा करण्याची जबाबदारी या तुकडीवर सोपविण्यात आली होती. ही तुकडी घेऊन जाणा-या वाहनाचे सारथ्य बाबासाहेब करीत होते. घनदाट जंगलातून मार्ग काढीत बाबासाहेब कावरे सैनिकांनी भरलेले वाहन घेऊन थेट मणिपूरच्या सीमेजवळ पोहोचत असतानाच जंगलात लपलेल्या अतिरेक्यांनी भारतीय सैन्याच्या वाहनांवर गोळीबार सुरु केला. भारतीय जवान त्यांना प्रत्युत्तर देत होते. त्याचवेळी भारतीय सैन्याला अतिरेक्यांच्या टापूतून सुखरुप बाहेर काढण्यासाठी बाबासाहेब यांनी वाहनाचा वेग वाढवला़.त्यामुळे अतिरेक्यांना सैन्यावर गोळीबार करणे अशक्य होऊ लागले़. अतिरेक्यांनी गोळीबार थांबविला.पण पुढे एक अवघड वळण आले आणि गाडीचा वेग कमी करावा लागला. ती संधी साधून अतिरेक्यांनी थेट बाबासाहेब यांनाच ‘टार्गेट’ केले. बाबासाहेबांवर अतिरेक्यांनी गोळीबार सुरु केला़ दोन गोळ्या बाबासाहेबांना लागल्या़ भारतीय सैन्यानेही अतिरेक्यांवर जोरदार हल्ला चढविला़ बाबासाहेब जखमी झाले होते तरीही त्यांनी वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न सुरुच ठेवला़ अतिरेक्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरु होता़ त्यात इतर दोन ते तीन जवानही जखमी झाले़ बाबासाहेब यांच्या मांडीला गोळ्या लागल्या़ भारतीय सैन्य अतिरेक्यांवर तुटून पडले़ त्यामुळे अतिरेक्यांनी तेथून पळ काढला़ बाबासाहेब पूर्णपणे घायाळ झाले होते़ उर्वरित जवानांनी मुख्य छावणीला अतिरेकी हल्ल्याची माहिती देऊन बाबासाहेब यांच्यासह अन्य सैनिक जखमी झाल्याचे सांगितले़ तातडीने तेथे हेलिकॉप्टर पाठविण्यात आले़ बाबासाहेब व अन्य जखमी सैनिकांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. अतिरेक्यांचे चक्रव्यूह फोडून सैन्याचे वाहन बाहेर काढण्यासाठी कसे प्रयत्न केले, अतिरेक्यांना कसे पळून लावले हे हसत हसत बाबासाहेब वरिष्ठांना सांगत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली़ जवानांची एक पलटन वाचविणारे बाबासाहेब मात्र मृत्यूच्या जबड्यातून बाहेर येऊ शकले नाहीत.मुख्यमंत्र्यांनी केला गौरवबाबासाहेब कावरे यांनी देशरक्षणासाठी देह ठेवला. बाबासाहेब यांची पेन्शन वीरपत्नी स्वाती यांना मिळतेय.पण त्यातून पूर्ण कुटुंबाची गुजराण करणे शक्य होत नाही. एस.टी.महामंडळाने मोफत प्रवासाचा पासही स्वातीतार्इंच्या नावे केला. नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीरपत्नी स्वाती कावरे यांचा सत्कार करुन शासकीय गौरव करण्यात आला.पण कुटूंबाला नियमीत उत्पन्न मिळेल, असे काही व्हावे अशी वीरपत्नी स्वाती यांची इच्छा आहे. कमी शिक्षणामुळे केंद्रसरकारची पेट्रोलपंप देण्याच्या योजनेचा फायदा घेता आला नाही. मात्र, अशा नियमातून सवलत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.भावाने उभारले स्मारकशहीद जवान बाबासाहेब कावरे शहीद झाल्यानंतर त्यांचे वडील सखाराम, आई इंदुबाई, पत्नी स्वाती व भाऊ अशोक यांनी गावातील सहका-यांना बरोबर घेऊन ज्या ठिकाणी बाबासाहेब यांच्यावर अंत्यसंस्कार झाले, त्याच ठिकाणी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. सध्या तेथे चांगले स्मारक उभारण्यात आले आहे. त्यांचे बंधू अशोक व ग्रामस्थ दरवर्षी शहीद दिन साजरा करुन जवानांची एक पलटण वाचविणा-या बाबासाहेबांना सलाम करतात.
शब्दांकन - विनोद गोळे