भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ ला युद्ध पेटले. या युद्धात कोळगावचे भूमीपुत्र श्रीपती कलगुंडे यांच्या तुकडीने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन हल्ला चढविला. तनोट माता मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले आणि हर हर महादेव..ची गर्जना करुन पाकिस्तानच्या सैन्याची धुळधाण उडविली़ या युद्धात भारताने बाजी मारली़ कराचीत भारताचा झेंडा फडकला़ हा झेंड फडकविण्याचा मान वीर योद्धा श्रीपती यांना मिळाला़ पण या लढ्यात एक तोफगोळा अंगावर पडून २२ सप्टेंबर १९६५ रोजी श्रीगोंद्याचा मर्द मराठा मावळा भारतमातेच्याही रक्षणासाठी कामी आला़ स्वातंत्र्यानंतर देशासाठी प्राणाची आहुती देणारे श्रीपती कलगुंडे पहिले ठरले़कोळगाव हे दुष्काळी गाव. पण ही भूमी शूरविरांची़ पहिल्या महायुद्धात कोळगावचे ५१ जण शहीद झाले आणि येथील तरुणाई युद्धभूमीवर जाऊन लढण्यासाठी पेटून उठली. श्रीपती कलगुंडे यांचा जन्म नामदेव व सरुबाई यांच्या पोटी मकरसंक्रांतीच्या दिवशी म्हणजे १४ जानेवारी १९४० ला झाला. वडिल नामदेव यांनी इंग्रज राजवटीपासून सैन्यदलात नोकरी केली. त्यामुळे श्रीपती यांनी वडिलांकडून युद्धभूमीच्या शौर्यगाथा बालपणी ऐकल्या होत्या. श्रीपती यांनी कोळगाव येथील लोकल बोर्डाच्या शाळेत प्रवेश घेतला. श्रीपती हे पहिलीच्या वर्गात शिकत होते. स्वातंत्र्य चळवळीत देशभक्तांनी बलिदान दिल्याची भाषणे शोत झाली़ त्यातून श्रीपती यांच्यामध्ये देशभक्तीची ज्योत प्रज्वलित झाली़ त्याचदरम्यान स्वातंत्र्यासाठी नामदेव यांनी बलिदान दिल्याची वार्ता सरुबाई यांच्या कानी पडली़ त्यांनी पतीच्या निधनाचे दु:ख पचवून श्रीपती यांचा सांभाळ केला.बलदंड शरीरयष्टीमुळे १९ व्या वर्षी म्हणजे १९५९ ला श्रीपती खाकी वर्दी घालून भारतीय सैन्यदलात दाखल झाले. श्रीपती यांनी प्रशिक्षण काळात रणगाडे चालविणे आणि तोफगोळे फेकणे यामध्ये चमक दाखविली. त्यामुळे श्रीपती हे जवानांच्या तुकडीचे लीडर झाले.१९६२ ला भारत-चीन युद्ध झाले. यामध्ये श्रीपती यांना शौर्य दाखविण्याची संधी मिळाली. या लढाईत त्यांनी युद्ध कौशल्य आत्मसात केले. त्यामुळे श्रीपती यांचे मनोधैर्य चांगलेच उंचावले होते. त्यानंतर भारत-पाक यांच्यात १९६५ साली युद्ध भडकले. श्रीपती यांना भारत-चीन युद्धाचा अनुभव असल्यामुळे कॅप्टनने श्रीपती यांना त्यांच्या तुकडीचे नेतृत्त्व करण्याची संधी दिली़पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी भारतीय फौज रणगाडे घेऊन पाकिस्तानमध्ये घुसली. त्यांचे काही रणगाडे सुरुवातीलाच फोडले. श्रीपती यांच्या तुकडीने तनोट माता मंदिराचे दर्शन घेऊन हर हर महादेव़़ अशी गर्जना करीत लोंगेवालापासून कराचीच्या दिशेने कूच केले़ श्रीपती कलगुंडे यांची तुकडी सर्वात पुढे होती.भारत-पाक सैन्यात जोरदार युद्ध पेटले होते़ गोळीबार, बॉम्बचा वर्षाव आणि तोफगोळे फुटत होते. भारतीय सैन्याने कराचीपर्यत धडक मारली. श्रीपती यांनी तिथे तिरंगा झेंडा फडकविला. पाकिस्तानी सैन्याच्या डोळ्यात रक्त उतरले. पाकिस्तानच्या सैन्याने श्रीपतीला लक्ष केले. २२ सप्टेंबर १९६५ रोजी श्रीपती यांच्या तुकडीवर पाकिस्तानी सैन्याने तोफांचा मारा केला़ त्यात श्रीगोंद्याचा मर्द मावळा शहीद झाला. पण युद्ध भारताने जिंकले. भारत-पाक युद्धात ऐतिहासिक कामगिरी करणारे श्रीपती कलगुंडे हे स्वातंत्र्यानंतर राष्ट्रासाठी बलिदान देणारे श्रीगोंद्यातील पहिले वीर ठरले़ त्यावेळी श्रीपती कलगुंडे यांचे लग्नही झालेले नव्हते.लाल बहादूर शास्त्रींनी घेतली दखलश्रीपती कलगुंडे यांची शौर्य गाथा ऐकून तत्कालिन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना खूप दुख झाले. त्यांनी स्वहस्ताक्षरात वीरमाता सरुबाई कलगुंडे यांना पत्र लिहून शोक व्यक्त केला होता. भारत सरकारकडून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीपती यांना सेनापदक जाहीर केले. हे पदक भारताचे तत्कालीन सेनादलाचे प्रमुख वेद मलिक यांच्या हस्ते वीरमाता सरुबाई यांना प्रदान करण्यात आले़ त्यानंतर पुणे येथील दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांनी या वीरमातेचा पुण्यात भव्य सन्मान केला होता़श्रीगोंद्यात ध्वजारोहण२६ जानेवारी १९६८ रोजी श्रीगोंदा तहसीलदार कार्यालयासमोर वीरमाता सरुबाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्रीपती यांच्या मातोश्रींचा मानपत्र देऊन श्रीगोंदेकरांनी गौरव केला. यावेळी श्रीपती यांच्या आठवणीने या वीरमातेला अश्रू अनावर झाले होते. १२ आॅक्टोबर १९८५ रोजी वीर माता सरुबाई यांनी जगाचा निरोप घेतला.कोळगावकरांनी दखल घ्यावीकोळगावकरांनी शहीद जवान सचिन साके व भाऊसाहेब तळेकर यांचे स्मारक उभारुन आठवणी जतन करुन ठेवल्या आहेत. मात्र श्रीपती कलगुंडे या वीर जवानाचे स्मारक उभारण्याकडे दुर्लक्ष झाले आहे़ श्रीपती कलगुंडे हे स्वातंत्र काळानंतर शहीद झालेले कोळगावचे पहिले जवान आहेत़ त्यांची इतिहासाने नोंद घेतली़ मात्र, कोळगावकरांनी त्यांची फारशी दखल घेतली नसल्याचे दिसते़ त्यामुळे कोळगावकरांनी श्रीपती कलगुंडे यांच्या नावाने एखादा चौक विकसीत करावा, अशी मागणी होत आहे़शब्दांकन : बाळासाहेब काकडे
शूरा आम्ही वंदिले! : श्रीगोंद्याच्या शूर जवानाने कराचीत फडकविला तिरंगा, श्रीपती कलगुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:27 PM
भारत-पाकिस्तानमध्ये १९६५ ला युद्ध पेटले. या युद्धात कोळगावचे भूमीपुत्र श्रीपती कलगुंडे यांच्या तुकडीने पाकिस्तानच्या भूमीत जाऊन हल्ला चढविला
ठळक मुद्देनायक श्रीपती कलगुंडेजन्मतारीख १४ जानेवारी १९४०सैन्यभरती १९५९वीरगती २२ सप्टेंबर १९६५सैन्यसेवा ६ वर्षे वीरमाता सरुबाई कलगुंडे