सुखदेव रोकडे म्हणजे शिस्तीचा माणूस. त्यांचे असेच वर्णन कुटुंबीयांकडून आजही केले जाते. सैन्यात गेल्यानंतर ही शिस्त त्यांच्या अंगात भिनली. देशाचा अभिमान त्यांच्या नसानसातून ओसंडून वहात होता. काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर एखादा हबकून गेला असता. सुखदेव यांना मात्र या नियुक्तीने आनंद झाला. देशासाठी काही करून दाखवण्याची ही त्यांनी संधी मानली.म्मू काश्मीर हा भारताचा कायमचा अशांत भाग. वाळवणे (ता. पारनेर) येथील सुखदेव रोकडे या तरूण जवानाला लष्करातील १० वर्षांच्या सेवेनंतर सन १९९६ मध्ये तिथे नेमणूक मिळाली तेव्हा तो भलताच सुखावला. काही करण्याची, करून दाखवण्याची संधी मिळणार याची त्याला खात्रीच पटली. वाळवणे तसा दुष्काळीच भाग. वडील मारूती रोकडे शेती करून कुटुंब चालवत. सुखदेव थोरला. शेतीवर काही भागणार नाही हे त्याला कळाले. तरूण मन, त्यात घरासाठी काही करायचा उत्साह. मावसभाऊ अंबादास रोकडे सैन्यात होते. त्यांच्याकडून युद्धाच्या, सैनिकी जीवनाच्या कथा सुखदेवला ऐकायला मिळत. त्यातून त्याला सैन्यात भरती होण्याची आवड निर्माण झाली. सैन्यात भरती झाल्यानंतर त्याला नेमणूक मिळाली ती अशांत काश्मीरमध्ये.आॅपरेशन रक्षकपाकिस्तानी अतिरेक्यांनी काश्मीरमध्ये त्यावेळी दहशत माजवली होती. त्यांना पाकिस्तान सरकारची मदत होती. शस्त्र पुरवली जात होती. त्यांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय लष्कराने आॅपरेशन रक्षक अभियान सुरू केले. सुखदेव यांची त्यात निवड झाली त्यावेळी त्यांना आभाळ ठेंगणे झाले. २३ एप्रिल १९९६. अतिरेक्यांनी भारतीय सैन्य दलाच्या तळावर पूर्ण तयारीनिशी हल्ला चढवला. त्यांचा प्रतिकार करण्याचा आदेश वरिष्ठांनी सैन्याच्या एका तुकडीला दिला. त्यात सुखदेवचा समावेश होता. अतिरेक्यांना पिटाळून लावा असा आदेश त्यांना देण्यात आला.खडतर प्रसंगप्रसंग एकदम खडतर व युद्धामध्ये कधीही असू नये असा होता. अतिरेकी डोंगरावर वरील बाजूस व भारतीय सैन्य डोंगराच्या तळाशी अशी स्थिती होती. त्यांना भारतीय सैन्य अगदी सहज दिसत होते व टिपताही येत होते.वरिष्ठांचा आदेश होता अतिरेक्यांना पिटाळून लावण्याचा. तो लक्षात घेऊन सुखदेव यांच्या तुकडीने नेट लावला. वरून तुफान हल्ला होत असतानाही डोंगराच्या बरोबर मध्यापर्यंत ते पोहचले. सुखदेवही त्यात होते. ते व त्यांचे सहकारी खालून गोळीबार करत होते. गोळीबार करायचा, लपायला जागा मिळाली की लपायचे व संधी मिळाली की गोळ्या झाडत पुढे जायचे अशी युद्धनिती त्यांनी अवलंबली होती. त्यात त्यांना चांगले यशही मिळत होते.अखेरच्या श्वासातही भारतमाताचसमोरून येणाऱ्या गोळ्या चुकवायच्या व त्याचवेळी आपणही समोर गोळ्या झाडायच्या असा तो प्रकार बराच वेळ सुरू होता. अतिरेकी काही हलायला तयार नव्हते व त्यांना सोडायला भारतीय सैन्याची ही बहादूर तुकडी. सुखदेव यांच्या गोळ्यांना काहीजण बळीही पडले. मात्र त्यांना नव्या दमाची कुमक मिळाली. अशा समरप्रसंगात एखादी गोळी कधी तुमचा घास घेईल सांगता येत नाही. तेच झाले. सू सू करीत चार गोळ्या आल्या व तुकडीच्या अग्रभागी असलेल्या सुखदेव यांच्या छातीवर लागल्या. वाळवण्याचे जवान सुखदेव रोकडे धारातीर्थी पडले. निधड्या छातीने त्यांनी शत्रूचा सामना केला. तीन ते चार गोळया त्यांच्या छातीत लागल्यानंतरही ते काही काळ शुद्धीत होते व भारतमातेचा जयजयकार करीत होते असे त्यांचे त्यावेळचे सहकारी सांगतात.शिस्तीचा माणूससुखदेव यांच्या त्यावेळच्या सहकाºयांनी त्या प्रसंगाची आठवण रोकडे कुटुंबीयांना सांगितली त्यावेळी त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. सुखदेव सैन्यात भरती झाल्यानंतर सुपा येथील हिराबाई पवार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. ऊज्ज्वला व प्रशांत ही मुले झाली. सुखदेव यांच्या मनात सैन्य व सैन्यातील आपली नोकरी याचा फार अभिमान होता. सैन्यातील शिस्त त्यांच्या अंगात अगदी भिनली होती. मुलांनीच काय कोणीही बेशिस्त वागलेले त्यांना आवडत नसे. लगेच ते त्यांना फैलावर घेत. रागावले तरी त्यांच्या मनात प्रेम असे. सुटीवर आल्यानंतर ते शेतीतील कष्टाची अशी सर्व कामे अगदी जाणीवपूर्वक करत असत. हिराबाई, सुखदेव यांचे बंधू महादेव व मेहुणे दगडू पवार यांनाही सुखदेव यांचा अभिमान आहे.अंत्यदर्शनही मिळाले नाहीदुर्दैवाने त्यांना सुखदेव यांचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. ते शहीद झाल्याची तार सैन्यदल कार्यालयाने केली, मात्र ती पंधरा दिवस उशिराने मिंळाली. रोकडे कुटुंबीय तार मिळाल्यानंतर तिथे पोहचले मात्र त्यांना उशीर झाला होता. कारण सैन्याधिकाºयांनीच त्यांच्या पार्थिवावर तिथेच अंत्यसंस्कार केले. त्यांच्या अस्थी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आल्या. देशासाठी बलिदान दिलेल्या आपल्या पतीच्या त्या अस्थी छातीशी धरून हिराबाई गावात परतल्या.
शब्दांकन : विनोद गोळे