पारनेर तालुक्यातील सुपा येथील भानुदास यल्लाप्पा गायकवाड हे १९८८ मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते़ मध्य प्रदेशातील सागर येथे प्रशिक्षण झाल्यानंतर त्यांनी अंदमान-निकोबार, भटींडा, आसाम येथे देशसेवा केली. अतिरेक्यांशी लढण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेऊन ते जम्मू काश्मिरमधील कारगील भागात दाखल झाले़ ते १९९९ साल होते़ भारतीय लष्कराने कारगील विजय आॅपरेशन हाती घेतले होते़ त्यात गायकवाडही प्राण हाती घेऊन पाकिस्तानी अतिरेक्यांशी लढत होते़ अतिरेक्यांकडून भारतीय सैन्यावर गोळ्यांचा वर्षाव होत होता़ उंचच उंच डोंगररांगांमध्ये अनेक अतिरेक्यांना भारतीय सैन्याने कंठस्नान घातले होते. भारतीय सैन्याची आगेकूच सुरु होती़ तो १७ जुलैचा दिवस होता़ अचानक गायकवाड यांच्या तुकडीवर गोळीबार सुरु झाला़ दोन गोळ्या गायकवाड यांना लागल्या़ जखमी अवस्थेतही ते अतिरेक्यांवर फायरिंग करीत होते.पारनेर तालुक्यातील सुपा हे शहीद भानुदास यल्लाप्पा गायकवाड यांचे गाव. यल्लापा व त्यांची पत्नी कान्हुबाई यांचा बांबूपासून विविध वस्तू तयार करण्याचा व्यवसाय़ दिवसभर बांबूच्या शोधात फिरायचे आणि मिळेल तशा वेळात बांबूच्या काड्यांपासून टोपल्या, डाल्या, पाट्या, सूप अशा विविध वस्तू बनवायच्या़ पुन्हा या वस्तू विकण्यासाठी दारोदार फिरायचे़ त्यातून मिळणाऱ्या चार पैशांवर संसाराचा गाडा हाकायचा़ असं कैक कष्टांचं त्यांचं जीणं़ भानुदास हा त्यांचा मुलगा़ धिप्पाड शरीरयष्टी आणि तल्लख बुद्धी़ भानुदास यांचे सुपा येथे शिक्षण झाले़ दहावीनंतर त्यांनी स्वत:च सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला़ भरतीसाठी प्रयत्न सुरू असतानाच शिरूर येथील मीनाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला़ विवाह झाल्यानंतरही त्यांनी भरतीसाठी प्रयत्न सुरूच ठेवले आणि पिळदार शरीरयष्टीच्या भानुदास यांच्यासाठी १९ एप्रिल १९८८ रोजी भारतीय सैन्यदलाचे दार उघडले़ ते भरती झाले़टोपल्या, सूप बनवण्याच्या पारंपरिक व्यावसायावर गुजराण करणे अवघड होत होते़ कुटुंबाचा डोलारा वाढत होता़ पण आर्थिक बाजू पेलवत नव्हत्या़ त्यामुळे हा डोलारा सांभाळायचा तर नोकरी करावीच लागेल, असे गायकवाड कुटुंबाचे मत बनले होते़ त्यामुळे भानुदास गायकवाड यांच्या सैन्यात जाण्याच्या निर्णयाला कोणी विरोध केला नाही़गायकवाड यांच्या पत्नी मीनाबाई सांगतात, ‘एखाद्या नववधूला सासरी पाठवावे, तशी भानुदास यांची साश्रुनयांनी आम्ही पाठवणी केली़ पहिले नऊ महिने मध्यप्रदेशातील सागर येथे त्यांचे प्रशिक्षण सुरु होते़ मात्र, इकडे रोजच जीव झुरणी लागायचा़ एकएक दिवस ढकलणे कठीण जात होते़ ते देशसेवा करतात, अशी समजूत काढून काळजावर दगड ठेवायला शिकत होते़ पण जमत नव्हते़ त्यामुळे आमचे सासरे यल्लाप्पा व सासू कान्हूबाई या सारख्या परिस्थितीची जाणीव करुन देत होत्या़ देशसेवा सर्वोच्च असल्याचे सांगत होते़ धीर देत होते़ सैन्यातून काही दिवस सुट्टीवर आल्यावर ते पुन्हा टोपल्या, सूप बनविण्याचे काम करत़ त्यांच्याकडे पाहून मनाला उभारी येई़ कोणत्याही प्रसंगाला धीटाईने सामोरे जाण्याचे बळ आम्हाला त्यांच्याकडूनच मिळाले. भानुदास गायकवाड यांची सागर (मध्यप्रदेश) येथून आसाम येथे बदली झाली़ तेथे तीन वर्षे सेवा केल्यानंतर पठाणकोट, अंदमान-निकोबार, भटींडा अशा ठिकाणी ते देशसेवेसाठी तैनात होते.१९९९ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी घुसखोरांच्या कारवाया वाढल्या होत्या़ त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराने देशभरातून अनेक प्रशिक्षित व धाडसी जवानांना जम्मू काश्मीरमध्ये पाचारण केले होते़ आॅपरेशन विजय नाव देऊन त्यावेळी भानुदास गायकवाड यांच्यासह अनेक जवांनाची टीम उभारण्यात आली होती़ त्यावेळी जम्मू काश्मीरमधील कारगील भागात पाकिस्तानी घुसखोरांवर हल्ला चढवण्याचा निर्णय भारतीय लष्कराने घेतला़ त्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या़ भानुदास गायकवाड हेही एका टीममध्ये होते़ कारगीलमधील उंचच उंच टेकड्या पार करीत भारतीय सैन्य पाकिस्तानी जवानांना यमसदनी धाडत होते़ घुसखोरांची पीछेहाट तर भारतीय सैनिकांची आगेकूच सुरु होती़ भारतीय लष्कराने अतिरेक्यांचे तळ उदध्वस्त करण्याची मोहीम आखली होती़ त्यादिशेने सैन्याची पावले पडत होती.१७ जुलै १९९९ चा तो दिवस होता़ एका उंच डोंगराच्या कपारीतून भारतीय जवानांवर अतिरेक्यांनी गोळीबार केला़ त्यात दोन गोळ्या भानुदास गायकवाड यांच्या छातीत घुसल्या़ तरीही जखमी अवस्थेत ते लढतच होते़ मात्र सगळीकडूनच गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर होत होता़ अखेरीस लढता-लढता देशासाठी ते शहीद झाले़ २१ जुलै रोजी त्यांचे पार्थिव घरी आणले गेले़ त्यांचे आई, वडील, पत्नी, मुले यांनी टाहो फोडला़ ‘भारत माता की जय’च्या जयघोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्यामागे आई कान्हुबाई, पत्नी मीना, मुलगा बाळासाहेब, तीन मुली असा परिवार असून, ते सुपा येथे पारंपरिक व्यवसायावर अवलंबून आहेत़मुलावर टपरी चालवण्याची वेळशहीद जवान भानुदास गायकवाड यांचा मुलगा बाळासाहेब याला नोकरी मिळावी म्हणून मीनाबाई यांनी बरेच प्रयत्न केले़ परंतु त्यात यश आले नाही़ अखेर बाळासाहेब यांनी सुपा येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पानटपरी टाकून उदनिर्वाह सुरु केला आहे़ सुपा ग्रामपंचायतीने गायकवाड कुटुंबीयांना घरकूल दिले आहे़ मात्र सासूबाई एक मुलगी, मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार सांभाळण्याची जबाबदारी पत्नी मीना यांच्यावर आली आहे़ सध्या मिळणा-या पेन्शनवरच त्यांचे कुटुंब जगत आहे.गायकवाड यांचे सुपा येथे स्मारक व्हावे१५ आॅगस्ट, २६ जानेवारी रोजी सर्वांचेच देशप्रेम जागे होते़ जवानांचे गुणगान गायले जाते़ मात्र, सुपासारख्या पुढारलेल्या गावात शहीद जवानांचे स्मारक बांधण्याचे धारिष्ट्य प्रशासनाने दाखविलेले नाही़ कारगीलमध्ये शहीद झालेले जवान भानुदास गायकवाड हे सुपा येथील रहिवासी़ त्यांचे कुटुंबीयही सुपा येथेच राहतात़ मात्र, अद्यापही गावात गायकवाड यांचे स्मारक नाही़ ग्रामपंचायतीने गायकवाड यांचे स्मारक उभारुन विधायक उपक्रम हाती घ्यावेत, हीच खरी गायकवाड यांना श्रद्धांजली ठरेल़, असे सुपा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.- शब्दांकन : विनोद गोळे