काश्मीरमधील पूंछ परिसरात जून १९९५ मध्ये भारतीय सैन्याने अतिरेक्यांविरोधात आॅपरेशन ‘रिनो’ सुरू केले़ भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना उखडून फेकणे हेच या आॅपरेशनचे उद्दिष्ट होते़ दारूगोळा सोबत घेऊन सैनिक मैदानात उतरले़ अतिरेक्यांवर तुटून पडले़ तोफांचा मारा होत होता़ सैन्यातील प्रमुख अधिका-यांसोबत कडेकपा-यातून वाट काढत जवान पुढे सरकत होते़ याच तुकडीत नेवासा तालुक्यातील वांजोळी येथील सुनील श्रीपती साबळे यांचाही समावेश होता़ अधिकारी आणि सैनिकांचा ताफा अतिरेक्यांच्या दिशेने चाल करून जात होता़ याचवेळी अतिरेक्यांनी भारतीय अधिकारी आणि जवानांचा समावेश असलेल्या वाहनालाच टार्गेट केले़ या हल्ल्यात सुनील साबळे यांच्यासह चार सैनिक शहीद झाले़नगर-औरंगाबाद महामार्गालगत नेवासा तालुक्यातील अडीच हजार लोकवस्ती असलेल्या वांजोळी येथील शेतकरी कुटुंबातील श्रीपती व सुमन साबळे यांच्या पोटी १९ आॅगस्ट १९७२ रोजी सुनील यांचा जन्म झाला़ श्रीपती यांना एकूण पाच अपत्य होते. शेती व्यवसाय करत ते संसार चालवित होते़ सुनील यांच्यासह भाऊसाहेब, सुरेश व रमेश हे तीन भाऊ व छोटी बहीण सुनंदा यांनी गावातीलच प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले़ आठवीनंतरचे शिक्षण घेण्यासाठी सुनील हे अहमदनगर येथील संबोधी विद्यालयातील वस्तीगृहात दाखल झाले़ वस्तीगृहात राहून ते दहावी पास झाले़ सुनील यांचा मोठा भाऊ भाऊसाहेब व दुसरा सुरेश यांचे शिक्षणही दहावीपर्यंतच झाले. दरम्यान सुनील यांना सैन्यात सेवा करत असलेला त्यांचा चुलत भाऊ भेटला़ ही भेट सुनील यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली़ त्याच्याकडून सुनील यांना सैन्यदलाविषयी माहिती मिळाली़ यातून त्यांना सैन्यदलाविषयी आकर्षण निर्माण झाले़ सुनील यांना लहानपणापासून व्यायामाची आवड होती़ त्यामुळे त्यांची शरीरयष्टी भक्कम होती़ अकरावी उत्तीर्ण झाल्यानंतर सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय सुनील यांनी घेतला़ देशसेवेसाठी ते आतूर झाले़ २४ एप्रिल १९९० रोजी ते कोपरगाव येथे सैन्य भरतीसाठी गेले़ घरातून कोपरगाव येथे जात असताना ‘आज मी सैन्यदलात भरती होऊनच परत येणार’ असे वाक्य सुनील यांचे होते़ सुनील यांच्यासमवेत त्यांचा मोठा भाऊ रमेश हेही भरतीसाठी गेले होते़ पहिल्याच प्रयत्नात दोघा बंधंूची सैन्यात निवड झाली़ रमेश हे उच्च शिक्षित असल्याने त्यांनी आई-वडिलांजवळच राहून नोकरी करावी, असा कुटुंबाचा निर्णय झाला़ सुनील सैन्यात भरती झाले, तेव्हा त्यांचे वय अवघे १८ वर्षे इतके होते़भरतीनंतर मध्यप्रदेशातील सागर येथे त्यांचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण झाले़ प्रशिक्षणानंतर ते घरी आले़ भारतीय सैन्यदलाची वर्दी अंगावर परिधान करून सुनील घरी आले अन् आई-वडिलांच्या डोळ्यात पाणी तरळले़ काही दिवसांतच सुनील यांची सुट्टी संपली आणि त्यांची पोस्टिंग पंजाब राज्यात झाली़ तेथे तीन वर्षे सेवा केल्यानंतर त्यांची जम्मू-काश्मीर राज्यातील पूंछ या अतिसंवेदनशील व नेहमीच आतंकवादी कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी बदली झाली. याठिकाणी आपल्याला आता काहीतरी पराक्रम गाजवता येईल़ शत्रूंशी लढाई करता येईल, या विचाराने सुनील उत्साहित होते़ त्यावेळी नातेवाईकांशी संवाद साधण्याचे साधन म्हणजे केवळ पत्रव्यवहार हेच होते़ कॅम्पमध्ये असल्याने त्यांचा बºयाच दिवसांपासून घरच्यांशी पत्रव्यवहार झाला नव्हता. शेवटच्या पत्रव्यवहारात जुलै महिन्यात सुट्टीवर येणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते. अतिरेक्यांविरोधात आॅपरेशन रिनो सुरू होणार ही बातमी सुनील यांना कदाचित माहित नसेल़ त्यामुळेच त्यांनी जुलैमध्ये घरी येतो, असा निरोप दिला़ नियतीने मात्र वेगळेच नियोजित करून ठेवले होते़ १९९५ च्या जून महिन्यात एक दिवस अचानक अतिरेक्यांविरोधात आॅपरेशन ‘रिनो’ची घोषणा झाली़ पूंछ परिसरात हे आॅपरेशन राबविण्यात येणार होते़ अतिरेक्यांना धडा शिकविण्यासाठीचे प्रशिक्षण सैनिकांना दिले़ युध्दाची रणनिती आखली गेली़ अतिरेक्यांना ठेचून काढण्यासाठी दारूगोळाही जमा होऊ लागला़ अतिरेक्यांचा सामना करण्यासाठी सैन्य सज्ज झाले़ अन् तो दिवस उजाडला़ १८ जून १९९५ रोजी भारतीय सैन्यांची अतिरेक्यांशी तुंबळ चकमक सुरू झाली़ अतिरेकी सैरभैर झाले़ त्यांनी सैन्याविरोधात कूटनिती आखण्यास सुरुवात केली़ सुनील साबळे हे या मोहिमेत आघाडीवर होते़ या मोहिमेत सहभागी असलेल्या अधिकाºयांच्या वाहनाला अतिरेक्यांनी लक्ष्य केले़ एक मोठे वाहन अतिरेक्यांनी चिचोंळ्या मार्गावरुन भरधाव वेगाने लष्कराच्या वाहनाच्या दिशेने नेले आणि लष्कराच्या वाहनाला धडकविले़ त्यात लष्कराचे वाहन खोल दरीत जाऊन कोसळले़ या दुर्घटनेत सुनील साबळे यांच्यासह चार जवान शहीद झाले़‘त्या’ अतिरेक्यांना ठार मारासुनील हे शहीद झाल्यानंतर दोन वर्षांनंतर सैन्य दलातील अधिकाºयांनी वांजोळी येथे सुनील यांच्या घरी येऊन साबळे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले़ आपला मुलगा देशासाठी शहीद झाला़ त्याच्या महान कार्यामुळेच देश आपल्या पाठीशी आहे, अशी भावना यावेळी साबळे कुटुंबीयांनी व्यक्त केली तर आमच्या सुनीलचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, त्या अतिरेक्यांना ठार मारा, अशी अपेक्षा सुनीलच्या कुटुंबीयांनी सैन्यातील अधिकाºयांकडे व्यक्त केली़शेतात उभारले स्मारकशहीद सुनील यांचे वडील श्रीपती यांनी आपल्या मुलाची आठवण म्हणून त्यांच्या शेतातच शहीद स्मारक उभारले आहे तसेच गावातही शहीद सुनील यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते़आई सुमनबाई यांना अश्रू अनावरआपला मुलगा शहीद झाला़ त्या घटनेवर त्यांच्या आई सुमनबाई यांचा आजही विश्वास बसत नाही़ या घटनेला आज २३ वर्षे उलटून गेले़ याची माहिती देताना आई सुमनबाई यांना अश्रू आवरता आले नाही़- शब्दांकन : सुहास पठाडे