१९७१ मध्ये ३ डिसेंबर रोजी भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या युद्धाला सुरूवात झाली. पाकिस्तानने एकाच वेळी जम्मू काश्मीर व पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) अशा दोन्ही ठिकाणांवरुन भारतावर हल्ले सुरू केले. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर देण्यास सुरुवात केली़ गोळीबार, तोफगोळे, हँडग्रेनेडचा मारा दोन्ही बाजूंनी सुरू होता. पूर्व पाकिस्तानवर आपली पकड मजबूत करण्यासाठी भारताने वायुसेनेला पाचारण केलं. वायुसेनेने पाकिस्तानच्या कित्येक अड्ड्यांवर हल्ला चढवून ते नष्ट केले. लष्करात गनर असलेल्या तात्याबा बर्गे यांनी या युद्धात आपल्या नेमबाजीच्या जोरावर अनेक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले. तात्याबा बर्गे यांच्या बंदुकीपुढे पाकिस्तानी सैनिकांचा निभाव लागत नव्हता़ भारतीय सैनिकांच्या सर्वात पुढे असलेल्या तात्याबा बर्गे यांच्यावर अखेरीस पाकिस्तानकडून बॉम्ब वर्षाव झाला आणि ५ डिसेंबर १९७१ रोजी सारोळा बद्दी येथील या वीर जवानास वीरगती प्राप्त झाली.नगर-जामखेड रस्त्यावर असलेलं नगर तालुक्यातील सारोळा बद्दी गाव. गावातील बहुतेक लोक शेती करतात. शेतीतून मिळणारा भाजीपाला किंवा दूध नगर शहरात नेऊन विकायचं. नगर शहर अवघ्या १५ मिनिटांच्या अंतरावर असल्याने या गावातील लोकांना शहराची बाजारपेठ जवळची आहे. चांदबिबी महालाच्या पायथ्याला असणारं हे टुमदार गाव. महालावरून या गावाचं हिरवगार सौंदर्य न्याहाळता येते.याच गावातील दगडू बर्गे व तान्हुबाई बर्गे हे शेतकरी कुटुंब़ या कुटुंबात ९ डिसेंबर १९४६ रोजी तात्याबा यांचा जन्म झाला़ दगडू बर्गे यांना चार अपत्य. तात्याबा हे सर्वात लहान असल्याने खोडकर व जिद्दी होते़ लहानपणापासून शेतातल्या मातीत राबत ते घरच्या लोकांना मदत करीत. दगडू बर्गे यांनी आपल्या पाचही मुलांना शिकवलं. गावातील प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत तात्याबा शिकले. पुढील शिक्षण घेण्यासाठी नगर शहरात जाण्याची वेळ आल्याने आणि घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने त्यांनी शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला.शिक्षण अर्धवट सोडून ते वडिलांना शेती कामात मदत करू लागले. बहिणीच्या लग्नासाठी घरातील पशुधन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली. उसनवारी आणि आर्थिक विवंचना वाढू लागली. तात्याबा आता समजदार झाले होते. आई-वडिलांचे कष्ट त्यांनी जवळून पाहिले असल्याने आता वेगळं काही तरी केल्याशिवाय मार्ग निघणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. नोकरी शोधण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली. कोणती नोकरी करायची, याचा विचार ते करू लागले. भक्कम शरीरयष्टी, कसदार शरीर व चपळाई यामुळे लष्करात भरती होण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावू लागला. पहिल्याच प्रयत्नात नगर येथे १८ डिसेंबर १९६३ साली ते लष्करात भरती झाले. आपल्या घरातील मुलगा भारतमातेच्या सेवेसाठी लष्करात भरती झाल्याने आई-वडिलांना मोठा आनंद झाला. घरातील भावंडे आनंदी झाली. दोन्ही बहिणींचा विवाह झाला होता.भरती झाल्यानंतर तात्याबा यांचं प्रशिक्षण बेळगावमध्ये झालं. गनर म्हणून त्यांना लष्करात सामील करून घेण्यात आलं. देशाचं रक्षण करण्याचं त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार होते. आजवर काळ्या आईची सेवा केली, आता देशसेवेचा नवा अध्याय त्यांच्या जीवनात सुरू झाला होता. नोकरी करताना जिथं पोस्टिंग मिळेल, तिथं ते उत्तुंग कामगिरी करीत असत. देशातील विविध ठिकाणी त्यांनी सेवा केली. आपल्या अतुलनीय नेमबाजीचे कौशल्य दाखवित त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहवा मिळवली. लढाईतील विविध हत्यारे चालविण्यात ते तरबेज झाले. युद्धातील बारीकसारीक गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला. सन १९६९ साली निंबोडी येथील जानकीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पण लग्नानंतर अवघ्या ६ महिन्यातच त्यांना सीमेवर हजर व्हावं लागलं़सन १९७० मध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांना तत्काळ जम्मू-काश्मीरमध्ये बोलावण्यात आलं. त्यावेळी भारत-पाकिस्तान सीमेवर पाकिस्तान सैन्याकडून आगळीक केली जात होती़ त्यामुळे भारतीय लष्कर सीमेवर तैनात करण्यात आले़ खडा पहारा सुरु होता़ छोट्या-मोठ्या चकमकी सीमेवर होत राहिल्या आणि डिसेंबर १९७१ मध्ये युद्धाला तोंड फुटले़ ३ डिसेंबर ते १६ डिसेंबर या काळात शेकडो सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती या युद्धात दिली. पाकिस्तानने भारताच्या ११ वायू ठिकाणांवर हल्ले करून ते नष्ट केले. यामुळे स्वतंत्र बांगलादेशाच्या मागणीसाठी पाकिस्तानसह पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) यांनी भारतीय लष्कराविरोधात युद्ध पुकारले. एकाच वेळी जम्मू काश्मीर आणि पूर्वेकडून पाकिस्तानने हल्ले सुरु केले. भारतीय सैनिकांनीही प्रत्युत्तरादाखल जोरदार हल्ला केला़ गोळीबार, तोफगोळे, हँडग्रेनेडचा मारा दोन्ही बाजूंनी सुरू होता. कित्येक सैनिक शहीद होत होते.भारतीय वायुसेनेने पूर्व पाकिस्तानवर आपली पकड मजबूत केली़ भारतीय लष्कराने भूपृष्ठ लढाईत पाकिस्तानचा मोठा भूभाग काबीज केला. त्यामध्ये आझाद काश्मीर, पंजाब, सिंधचा काही भाग यांचा समावेश होता. या लढाईत गनर तात्याबा बर्गे यांनी मोलाचे योगदान दिले होते़ त्यांनी आपल्या नेमबाजीच्या जोरावर अनेक पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले़ लांब पल्ल्याची गन घेऊन तात्याबा पाकिस्तानी सैन्यावर मारा करीत होते़ पाकिस्तानी सैन्यावर तुटून पडलेल्या तात्याबा बर्गे यांच्यावर पाकिस्तानकडून बॉम्ब टाकण्यात आला आणि ५ डिसेंबर १९७१ ला तात्याबा बर्गे या लढाऊ भारतीय जवानाने भारतमातेच्या कुशीत देह ठेवला़ तात्याबा शहीद झाल्याची तार तब्बल १ महिन्यानंतर सारोळा बद्दी या गावात आली. आपला तात्याबा शहीद होऊन एक महिना झाला आणि आपल्याला खबर नाही, या विचाराने घरातील लोक शोकाकुल झाले. अवघ्या ६ महिन्यांचा मिळालेला सहवास व अकाली आलेले वैधव्य वीरपत्नी जानकीबाई यांना मोठा आघात देऊन गेले.महिनाभरानंतर अस्थिकलश गावात१६ डिसेंबर १९७१ रोजी भारताच्या सैन्यापुढे पाक सैन्याने लोटांगण घातलं. पाकने आत्मसमर्पण केलं. या युद्धात सारोळा बद्दी येथील गनर तात्याबा बर्गे यांना हौतात्म्य आलं. त्यांनी युद्धात आपल्या अफाट युद्ध कौशल्याचं दर्शन घडवलं. मात्र, युद्ध काळात भारतीय लष्करानेच शासकीय इतमामात तात्याबा बर्गे यांच्यावर अंत्यसंस्कार केले़ युद्ध थांबल्यानंतर महिनाभराने तात्याबा यांच्या अस्थी व कपडे घेऊन लष्कराचे अधिकारी गावात आले. त्यांना पाहून आई-वडील व पत्नी यांनी मोठ्याने हंबरडा फोडला़ तात्याबा बर्गे यांच्या अस्थींची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसागर लोटला होता. त्यांचं गावाला सदैव स्मरण रहावे म्हणून, त्यांचं स्मारक गावात उभारण्यात आलं आहे़ ते आजही त्यांच्या अतुलनीय शौर्याची साक्ष देत आहे.मी भाग्यवान ठरले़ मला असा वीर पती मिळाला. देशासाठी प्राण देण्याचं भाग्य सर्वांना मिळत नाही. ते भाग्य माझ्या धन्याला मिळालं़ याचा मला सदैव अभिमान वाटतो. - जानकीबाई बर्गे, वीरपत्नी- शब्दांकन : योगेश गुंड
शूरा आम्ही वंदिले! : पाकवर तुटून पडला सारोळाबद्दीचा ‘गनर’, तात्याबा बर्गे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 3:08 PM
१९७१ मध्ये ३ डिसेंबर रोजी भारत-पाकिस्तान या दोन देशांच्या युद्धाला सुरूवात झाली. पाकिस्तानने एकाच वेळी जम्मू काश्मीर व पूर्व पाकिस्तान (सध्याचा बांगलादेश) अशा दोन्ही ठिकाणांवरुन भारतावर हल्ले सुरू केले.
ठळक मुद्देगनर तात्याबा बर्गे जन्मतारीख ९ डिसेंबर १९४६सैन्यभरती १८ डिसेंबर १९६३वीरगती ५ डिसेंबर १९७१सैन्यसेवा ८ वर्षेवीरपत्नी जानकीबाई बर्गे