भारतीय सैन्याला बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शत्रूंबरोबर लढाई लढावी लागते़ शेजारी राष्ट्रांकडून सीमेवर आगळीक केली जाते तर कधी सीमारेषा परिसरातील गावांना वेठीस धरले जाते. त्यांच्यापासून स्थानिकांचे रक्षण करण्याची जबाबदारी भारतीय जवान पार पाडतच असतात. नक्षलवाद्यांपासूनही स्थानिकांची हिफाजत करण्याचे दिव्य लष्कराला पार पाडावे लागते. अशीच एक नक्षलवादी संघटना म्हणजे युनायटेड नेशन लिबरेशन फ्रंट. या संघटनेच्या पाच नक्षलवाद्यांना एकाचवेळी यमसदनी धाडणारे बहादूर हवालदार म्हणून भानुदास उदार यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. या कामगिरीसाठी त्यांचा ‘शौर्य चक्र’ देऊन सन्मान करण्यात आला आहे.पारनेर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमेवरील चांभुर्डी हे छोटे गाव. गावात १ जून १९७२ रोजी पर्वती व सरस्वती उदार या अध्यात्मिक ध्यास असलेल्या कुटुंबात भानुदास यांचा जन्म झाला. त्यांना एकनाथ व संतोष हे दोन भाऊ. वडिलोपार्जित १०-१२ एकर जमीन. पण राहण्यास घर नव्हते. अशा परिस्थितीत दोघांच्या शिक्षणासाठी वडील पर्वती व आई सरस्वती यांनी कष्ट उपसले. एकनाथ व भानुदास यांना श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात शिक्षणासाठी पाठविले. पारनेर-श्रीगोंदा बसने दररोज डबा यायचा. सकाळी आलेला डबाच संध्याकाळी खावा लागायचा. अनेक वेळा सकाळची भाजी संध्याकाळपर्यत खराब व्हायची. पण परिस्थितीवर मात करण्याच्या ध्येयाने एकनाथ व भानुदास शिक्षण घेत होते. भानुदास बारावी पास झाले. बी.ए.च्या पहिल्या वर्षाला असताना सैन्य दलाच्या भरतीसाठी बेळगाव गाठले. भरतीला जाण्यासाठी पैसेही नव्हते. अंगावर घालण्यासाठी चांगले कपडे देखील नव्हते. मुलगा सैन्याच्या भरतीसाठी जाणार म्हणून वडिलांनी विसापूर गाठले. एक पँट-शर्ट शिवून आणला. त्यानंतर भानुदास रेल्वेने बेळगावला गेले. तेथे ९ मे १९९२ रोजी २१ मराठा रेजिमेंटमध्ये भरती झाले.देशासाठी विशेष काहीतरी करण्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी पॅरा कमांडोचे विशेष प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण अतिशय खडतर असते़ हजारो किलोमीटर उंचीवरुन हेलिकॉप्टरमधून जमिनीवर पॅराशूटच्या सहाय्याने उडी घ्यावी लागते. पाठीवर मोठा बोजा घेऊन मैलोन्मैल धावावे लागते. हेलिकॉप्टरमधून उंचीवरुन दोराच्या सहाय्याने जमिनीवर उतरावे लागते-चढावे लागते़ वाऱ्याच्या वेगाने धावत ‘टार्गेट’वर निशाणा साधून रायफल चालवावी लागते, असे हे खडतर प्रशिक्षण चित्याची चपळाई अंगात असलेल्या भानुदास यांनी घेतले़ त्यामुळे त्यांची २१ पॅरा स्पेशल फोर्समधील कमांडोच्या विशेष टीममध्ये निवड झाली.२६ जून १९९७ रोजी पारनेर तालुक्यातील सारोळा आडवाई येथील निवृत्ती व मालनबाई फंड यांची कन्या छाया यांच्याशी त्यांचा विवाह झाला. छाया यांनी आई-वडिलांना मदत करावी म्हणून तिला चांभुर्डीत ठेवले. प्रतीक्षा व आराधना या दोन कन्या आणि तिसरा प्रथमेश ही पुष्प संसारात उमलली. मुलींना चांभुर्डीतील शाळेला शिक्षणासाठी घातले. बालवाडीत असलेली आराधना हंगा नदी पार करीत असताना पाण्यात बुडू लागली. पण आजोबा त्रिंबक उदार यांनी तिला वाचविले. या घटनेनंतर भानुदास यांनी मुलांच्या शिक्षणासाठी पत्नीला नगरला पाठवले.पुढे १९९९ मध्ये त्यांची आसाममध्ये बदली झाली. त्यावेळी ते पत्नी छाया यांना बरोबर घेऊन गेले होते. आसामवरुन भानुदास उदार यांच्या कमांडो टीमला पुन्हा कारगीलला पाठविण्यात आले. यावेळी तेथील एका मंदिरात अतिरेकी लपल्याची माहिती भानुदास उदार यांच्या कमांडो टीमला मिळाली होती. त्यांनी मंदिराला वेढा घातला. अतिरेक्यांनी तेथे बॉबस्फोट घडवून आणला. या स्फोटात कॅप्टन पंडित यांचा एक पाय गेला होता तर भानुदास सुदैवाने बचावले होते. त्यानंतर त्यांनी पत्नी छाया यांना पुन्हा गावी आणले. २००७ मध्ये त्यांची बदली मणिपूरला झाली. मणिपूर भागात युनायटेड नेशन लिबरेशन फ्रंट या नक्षलवादी संघटनेने उच्छाद मांडला होता. या नक्षलवादी संघटनेकडून अनेकदा स्थानिकांना बंदी बनविले जायचे. त्यामुळे भारतीय लष्काराने ‘हिफाजत आॅपरेशन’ हाती घेतले़. या आॅपरेशनसाठी भानुदास उदार यांच्या पॅरा कमांडो टीमची निवड करण्यात आली होती़ त्यांनी ३ जुलैला पत्नी छाया यांना फोन केला़ ‘आमची फौज मंडलच्या जंगलात नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी निघाली आहे. आपला किमान दहा दिवस फोन होणार नाही’, अशी माहिती दिल्याची आठवण छाया यांनी सांगितली. तो त्यांचा शेवटचा फोन ठरला, असे सांगताना छायाताई यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. ८ जुलै २००७ रोजी भानुदास उदार यांची टीम नक्षलवाद्यांचा शोध घेत होती. त्याचवेळी समोरुन फायरिंगसाठी गन सरसावणा-या एका नक्षलवाद्याच्या दिशेने भानुदास उदार यांनी जोरदार फायरिंग केली. पहिल्याच गोळीत तो नक्षलवादी ठार झाला़ एक नक्षलवादी मेला, पण इतरांचा शोध घेत असताना घनदाट झाडीतून अचानक भानुदास उदार यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव झाला़ एक गोळी त्यांच्या डोक्यातून आरपार गेली़ भारतमातेच्या सुपुत्रांची ‘हिफाजत’ करताना भानुदास यांनीही आपला देह भारतमातेच्या कुशीत ठेवला़ नक्षलवाद्यांनी तेथून पळ काढला़ त्यानंतर कमांडोंनी परिसराची छाननी केली असता इतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह त्यांना आढळून आले़ हे सर्व भानुदास उदार यांच्या गोळीचे शिकार झाले असल्याचे सांगण्यात आले. याच कामगिरीसाठी भानुदास उदार यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले़चित्रकलेच्या परीक्षेत मी जिल्ह्यात दुसरी आली होती. त्यावेळी ते माझा सत्कार पाहण्यासाठी शाळेमध्ये आले होते. त्यानंतर आमचे बाबा पुन्हा आमच्याबरोबर कधीच आले नाहीत. मुलींचा त्यांना खूप लळा होता. आम्ही आता मोठ्या झालोत. पण बाबांच्या आठवणीविना दिवस जात नाही. - प्रतीक्षा उदार, मुलगी.
वीरपत्नी छाया यांच्यावर चार वर्षे उपचारभानुदास उदार हे शहीद झाल्याची बाब पत्नी छाया यांच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती़ पण आर्मीचे जवान भानुदास उदार यांचे पार्थिव घेऊन चांभुर्डीत येताच वीरपत्नी छाया यांनी एकच टाहो फोडला़ त्यांच्यावर आभाळच कोसळले. हे दु:ख उदार परिवाराला पचवणे अवघड झाले. वडील पर्वती यांना मानसिक त्रास झाला तर पत्नी छाया यांच्यावर हा आघात एव्हढा गंभीर होता की त्यांना चार वर्षे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले़ सुभेदार बाळासाहेब मोहारे, बापू फंड, बन्सी फंड यांनी त्यांना आधार दिला. भानुदास उदार यांच्या स्मृती कायम रहाव्यात, तरुणांना देशसेवेची प्रेरणा मिळावी, यासाठी गावात शहीद जवान स्मारक उभारण्यात आले आहे.
‘ते’ आनंदाश्रू साठविले अंतकरणातमुलगा प्रथमेश बालवाडीत असताना त्यांनी त्याला एक रुपया खाऊसाठी दिला होता. पण शाळेतून आल्यानंतर प्रथमेशने, ‘बाबा तुमचा रुपया घ्या आणि मला एक पुस्तक आणून द्या’, असे सांगितले. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. ते आनंदाश्रू मी माझ्या अंतकरणात साठवून ठेवले आहेत, अशी आठवण सांगताना वीरपत्नी छायाताई यांनाही अश्रू लपविता आले नाहीत.
मुलगा खिडकीत उभा राहून वडिलांची वाट पाहतोमुलगा प्रथमेश अडीच वर्षाचा असताना ते शहीद झाले. मुलगा माझे बाबा येतील या आशेने वाट पाहत असतो. कोणी सैनिक बॅग घेऊन येताना दिसला की तो टक लावून त्याकडे पाहतो. ज्या दिवशी त्याचा वाढदिवस असतो, त्यादिवशी तो खिडकीत उभा राहतो आणि आई माझे बाबा माझ्या वाढदिवसाला येतील ना! मला त्याला काय उत्तर द्यावे समजत नाही, अशी माहिती देताना वीरपत्नी छायाताई यांचा साडीचा पदर आपोआप डोळ्यांकडे गेला.
दिल्ली दाखविली माझा भानुदास शिळे तुकडे खाऊन शाळा शिकला. भरतीला गेला तेव्हा त्याच्या अंगावर ठिगळाची पँट होती. विसापूरला जाऊन नवी पँट शिवली. एका पँटीवर भरती झाला. त्यानंतर शेतात विहीर खोदली. पाइपलाइन केली. घरदार बांधले. आमच्यासाठी खूप केले. त्याला सोन्यासारखी बायको मिळाली. तीन मुले झाली. सुखाचा संसार झाला होता. मला व दीराला दिल्लीला नेले. देवधर्म केला़ पण देवाने त्याला आमच्यातून नेले, अशी आठवण सांगताना वीरमाता सरस्वती यांनी दोन्ही हात तोंडावर दाबून दु:खावेग आवरला.शब्दांकन : बाळासाहेब काकडे